मुंबई : यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मुंबई महापालिकेने केला आहे. मूर्तिकारांना शाडू माती पुरविण्यात येणार आहे. आता पर्यावरणपूरक रंगही देण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठी चाचपणी सुरू असून विक्रेता, पुरवठादार यांची निवड करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना हवी ती मदत करायला मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली आहे. शहरातील सर्व गणेशमूर्तीकारांना शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय अगोदरच घेण्यात आला आहे. आता गणेशमूर्ती रंगवताना वापरण्यात येणारे हानिकारक रंग बंद करून, पर्यावरणपूरक रंग वापरण्यासाठी पालिका मूर्तिकारांना आग्रह करणार आहे. यासाठी मूर्तिकारांना पर्यावरणपूरक पाण्याचे रंगही उपलब्ध करून देण्याचा विचार मुंबई महापालिकेचा आहे.
असे रंग बनवणारे उत्पादक, अधिकृत विक्रेते, पुरवठादार, वितरकांची निवड करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित करण्यात आली आहे. हे स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवण्याचा उद्देश मूर्ती आणि मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक पाण्यावर आधारित, जैव-विघटनशील आणि विषारी नसलेल्या व रंगांची उपलब्धता असल्याची माहिती करून देणे असा आहे. नंतर पर्यावरणपूरक रंगांचे मंजूर उत्पादक, अधिकृत विक्रेते, पुरवठादार व वितरकांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही पालिकेने सांगितले.