Mumbai Vada Pav | मुंबईचा ‘वडापाव’ जगात पाचव्या नंबरवर! Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Vada Pav | मुंबईचा ‘वडापाव’ जगात पाचव्या नंबरवर!

भारतीय खाद्यपदार्थ जगात भारी; 6 शहरांनी मिळवले ‘टॉप 100’मध्ये स्थान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मायानगरी मुंबईच्या चविष्ट पदार्थांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे! जगभरातील खाद्यपदार्थांची मानांकन करणारी सर्वात मोठी संस्था ‘टेस्ट अ‍ॅटलस’ने नुकतीच 2025-2026 साठी जगातील 100 सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईने सलग दुसर्‍यांदा जगात पाचवे स्थान पटकावले आहे. दिल्ली, लखनौ आणि हैदराबादसारख्या दिग्गज खाद्य शहरांना मागे टाकत, मुंबईतील वडापाव, पावभाजी आणि भेळपुरीच्या चटकदार चवीने जागतिक मंच गाजवला आहे.

मुंबई केवळ बॉलीवूड किंवा आर्थिक राजधानी नाही, तर ते उत्कृष्ट स्ट्रीट फूडचे माहेरघर आहे. या जागतिक मानांकनात, इटलीतील नेपल्सने पहिले स्थान मिळवले असले, तरी मुंबईचा ‘टॉप 5’मध्ये समावेश होणे ही भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या मानांकनासाठी जगभरातील सोळा हजारांहून अधिक पदार्थांवर सुमारे 5.9 लाख लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणातून मुंबईतील गल्लीबोळांत मिळणारा चटपटीत आणि कुरकुरीत देशी स्वाद आता जागतिक स्तरावर राज करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

‘टॉप 100’मध्ये 6 भारतीय शहरांचा समावेश असून, त्यात मुंबईला पाचवे, अमृतसरला 48 वे, नवी दिल्लीला 53 वे, हैदराबादला 54 वे, कोलकाताला 73 वे, तर चेन्नईला 93 वे स्थान मिळाले आहे.

‘टॉप 100’ डिशेसमध्ये अमृतसरी कुलचाचा वरचष्मा

शहरांच्या जोडीला, ‘टेस्ट अ‍ॅटलस’ने जगातील 100 सर्वोत्तम खाद्यपदार्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे. यात अमृतसरी कुलचाने सतरावा क्रमांक पटकावला. मुर्ग मखनी म्हणजेच बटर चिकनने 66 वे स्थान, हैदराबाद बिर्याणीने 72 वे स्थान, तर शाही पनीरने 85 वे स्थान मिळवले आहे. जगभरातील खवय्यांनी या भारतीय पदार्थांवर आपल्या पसंतीची मोहर उमटवली आहे.

केवळ शहरे आणि पदार्थांपुरतेच नाही, तर भारताच्या प्रादेशिक खाद्यसंस्कृतीनेही आपली छाप पाडली आहे. जगातील 100 सर्वोत्तम खाद्य प्रदेशांच्या यादीत चार भारतीय राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये दक्षिण भारत 40 वे, पश्चिम बंगाल 73 वे, महाराष्ट्र 76 वे, तर केरळने 97 वे स्थान पटकावले आहे.

जागतिक खाद्यसंस्कृतीत भारत तेराव्या स्थानावर

एकंदरीत, भारतीय खाद्यसंस्कृतीच्या मानांकनात भारताने यावर्षी 13 वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षीच्या 12 व्या स्थानावरून किंचित घसरण झाली असली, तरी भारताने पेरू, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशांना मागे टाकले आहे. ‘टेस्ट अ‍ॅटलस’ने बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा, तंदुरी चिकन आणि कोरमा हे भारतीय पदार्थ आवर्जून चाखून पाहण्यासारखे असल्याचे खास नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT