मुंबई, स्वप्निल कुलकर्णी
नगरं नयनं चारु, विविधं जीवनं सुखम् ।
व्यवस्था सततं यत्र, विज्ञानं च सुसंयुतम् ।।
असा एक संस्कृत श्लोक आहे. नगर दिसायला अंतर्बाह्य स्वच्छ व सुंदर हवे. त्यामध्ये सर्वांना जीवनातील सुख, समृद्धी, संस्कृतीचा अनुभव मिळावा. काळानुरूप विज्ञान, प्रगती, विकास यांचाही मेळ साधायला हवा, असा त्याचा अर्थ आहे. आदर्श नगराचा हा मूलमंत्र नजरेसमोर ठेवून, त्या दिशेने मुंबईचा प्रवास सुरू आहे. मुंबई महापालिकेने येथील वैभवशाली वारशांचा इतिहास 'अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव' या पुस्तकात माहिती आणि चित्ररूपात गुंफला आहे.
एशियाटिक ग्रंथालयाची भव्य वास्तू... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची देखणी इमारत... समुद्राच्या लाटांशी हितगुज करणारे ताज हॉटेल... दुरूनच लक्ष वेधून घेणारा मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर... जोगेश्-वरीतील गुंफा... मुंबईची ओळख सांगणाऱ्या वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक मुंबईत येतात. या ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास त्यांच्या वैशिष्ट्यांसह एकाच ठिकाणी पाहण्याची आणि वाचण्याची संधी 'अलौकिक मुंबईचे ७५ वास्तुवैभव' या पुस्तकाच्या माध्यमातून मिळाली आहे. मुंबई काळाच्या प्रवाहात असंख्य संस्कृती, परंपरा आणि स्मृती आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभी आहे. मुंबईचे अभिजात सौंदर्य शतकानुशतकांच्या पुरातन वारशात आणि भव्य वास्तूंमध्ये दडलेले आहे. महापालिकेने या पुस्तकात मुंबईतील ऐतिहासिक वारसा वास्तूंवर नव्याने प्रकाश टाकला असून वैभवशाली पुरातन वारशांची ही समृद्धता उलगडली आहे.
पूर्वकालीन इतिहासाच्या सुमारे पंधरा शतकांनी मुंबईला अपूर्व असा सांस्कृतिक वारसा बहाल केला. त्याची साक्ष देणाऱ्या गुंफा व लेणी बेटात कोरल्या. पंधराव्या ते अठराव्या शतकात मुंबईत किल्ले उभे राहिले, तर एकोणिसाव्या शतकात विकासाचे चक्र गतिमान होत असताना गॉथिक शैलींतील वास्तूंनी मुंबई नटून निघाली. दक्षिणेतील बेटांवर किल्ले व व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील आणि आर्ट डेको पद्धतीच्या वास्तू मोठ्या संख्येने उभारल्या गेल्या.
मुंबई हे कोट्यवधी लोकांना जगविणारे आणि त्यांच्यासाठी जागणारे महानगर, जे अथांग समुद्राच्या गाजेसोबत धडधडते, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पंखांमध्ये बळ भरते. इथल्या ऐतिहासिक वास्तू फक्त विटा व दगडांनी उभारल्या नाहीत, तर भावना, संस्कृती आणि अनेक पिढ्यांच्या स्मृती जतन करत घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. मुंबईच्या वारशांची भव्यता, अखंडता, स्थापत्यकलेतील सूक्ष्मता सचित्र अनुभवण्याची अनोखी संधी यानिमित्त वाचकांना मिळाली आहे, हे मात्र नक्की!
पुस्तकनिर्मितीत यांचे योगदान महत्त्वाचे
भूषण गगराणी (महापालिका आयुक्त तथा प्रशासक-भा.प्र.से), डॉ. अमित सैनी (अतिरिक्त महापालिका, आयुक्त पूर्व उपनगरे-भा.प्र.से), तानाजी कांबळे (जनसंपर्क अधिकारी), मिलिंद बाफना (उपजनसंपर्क अधिकारी), डॉ. विवेक राठोड, (सहायक जनसंपर्क अधिकारी), तेजस गर्ने (संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय), अभिजीत आंबेकर (अधीक्षक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण), संजय आढाव (कार्यकारी अभियंता, मुंबई महानगरपालिका), विनायक परब (ज्येष्ठ पत्रकार).
पुस्तकात नेमंक काय आहे ?
मुंबईच्या समृद्ध ऐतिहासिक पुरातन वारशांवर मुंबई महापालिकेने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न के आहे. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंट कान्हेरी लेणीपर्यंत, शिवाजी महाराज टर्मिनसपासून आर्ट डेको9k इमारतींपर्यंत, प्राचीन किल्ल्यांपासून वसाहतकालीन वास्तूंपर्यंतची दुर्मीळ, वर्तमानातील छायाचित्रं तसेच माहितीचा यात समावेश आहे.