Theft File Photo
मुंबई

Mumbai festive season house burglaries | मुंबईकर गावाला; चोरट्यांची मुंबईत दिवाळी ?

बंद घरांवर घरफोडी टोळ्यांची नजर; पवई, अंधेरीतील चोरीच्या घटनांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी मुंबईकर गावाकडे जात असताना बंद घरांवर चोरट्यांची नजर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेण्यासाठी घरफोडीच्या टोळ्या याआधी सक्रिय झालेल्या आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरात फ्लॅटमधून २५ लाखांचा ऐवज चोरीला जाण्यापासून ते अंधेरीतील चित्रपट निर्मात्याच्या घरात झालेल्या लाखौंच्या चोरीपर्यंतच्या घटनांनी उच्चभ्रू इमारतींमधील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांनी घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास चोरट्यांचीही दिवाळी मुंबईत साजरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याप्रकरणी ६२४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर दिवसा घरफोडीच्या १०९ घटना घडल्या आहेत. बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सुट्टीसाठी घराबाहेर पडल्यानंतर अनेक जण सहलीचे फोटो, व्हिडीओ आणि आपण कोणत्या ठिकाणी आहोत, याची माहिती सोशल मीडियावर तत्काळ शेअर करतात. काही जण लोकेशनसह पोस्ट टाकतात. मात्र, अशा पोस्टमधून घरमालक घरापासून दूर असल्याची माहिती अनवधानाने सार्वजनिक होते. याचा फायदा सायबर भामट्यांसह घरफोडी करणारे चोरटेही घेऊ शकतात. त्यामुळे सहलीचे फोटो आणि लोकेशन तत्काळ शेअर करण्याऐवजी घरी परतल्यानंतर पोस्ट करण्याचा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.

पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरातील एका इमारतीच्या १७व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ऑक्टोबर महिन्यात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील सात लाख रुपयांची रोकड, सोन्याची २० नाणी तसेच सोन्या-हिऱ्यांचे दागिने असा एकूण २५.९ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, घराचा दरवाजा किंवा कुलूप तोडल्याच्या खुणा पोलिसांना आढळल्या नव्हत्या. इमारतीत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही संबंधित कॅमेरे बंद असल्याचे तपासात समोर आले होते.

तसेच, अंधेरीतील सात बंगला परिसरात चित्रपट निर्मात अरेन मोरेस कैरो यांच्या घरातही लाखोंची चोरी झाली होती. निर्मात आणि त्यांची पत्नी व्हिएतनामला गेले असताना २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडले. त्यातून सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, रोलेक्स घड्याळ, हिऱ्याची अंगठी, परकीय चलन आणि रोकड

सीसीटीव्ही सुरू आहेत का, तपासा !

मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र, पवईतील चोरीच्या घटनेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ कॅमेरे बसवून उपयोग नाही, तर ते नियमित सुरू आहेत का, त्यांचे चित्रण सुरक्षित ठेवले जाते का आणि इमारतीत येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची नोंद घेतली जाते का, याची खात्री करणे आवश्यक आहे.

निवासी भागातील गस्तीचे पोलिसांसमोर आव्हान

दिवाळीच्या काळात बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला जातो. त्याचवेळी निवासी भागांमधील गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर नजर ठेवणे आणि सराईत घरफोड्यांच्या टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणेही पोलिसांना महत्त्वाचे आहे.

बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी सोसायटी व्यवस्थापनाला पूर्वकल्पना द्यावी. परिसरात संशयास्पद व्यक्त्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शेजाऱ्यांना कल्पना देऊनच घर सोडा

गावी किंवा पर्यटनासाठी जाताना घर किती दिवस बंद राहणार आहे, याची माहिती विश्वासू शेजाऱ्यांना द्यावी. घराच्या आसपास संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना कळविण्याची विनंती शेजाऱ्यांना करावी. तसेच घरातील दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घराच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT