मुंबई : ढगाळ वातावरण, मध्येच पाऊस आणि दुपारी उन्हाचे चटके आशा विचित्र वातावरणाचा सामना मुंबईकर आठवडाभर करीत आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याचा आजार बळवला आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली असून औषोधोपचारानंतरही आठवडाभर हा त्रास सहन करावा लागत आहे.
खासगी रुग्णालयांत दररोज 30 ते 40 तापाचे आणि 50 ते 60 सर्दी -खोकल्याचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महापालिका रुग्णालयांच्या ओपीडीत तर रांगा लागत आहेत. दुषीत अन्नपदार्थ किंवा पाणी पिल्याने संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे बाहेरचे खाणे आणि पाणी पिणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. यासह घरात कुलर किंवा एसीचा वापर टाळावा, घराभोवती पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरांचा सल्ला
लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यावी. जास्त ताप आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, शरीर दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असल्यास प्लेटलेट्स तपासून घ्याव्यात असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तीन ते चार दिवसांत ताप जाणे गरजेचे आह. मात्र सध्या आठवडाभर तापासह, सर्दी, खोकला जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे केईएमच्या एका डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईत सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये सध्या सुमारे 30 टक्केंनी वाढ झाली आहे. ही साथ औषधोपचाराने बरी होऊ शकते, परंतु औषधे मध्येच थांबवू नयेत. लक्षणे कमी झाली तरी उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार पुन्हा तीव्र होऊ शकतो.डॉ. मधुकर गायकवाड, मेडिसिन विभागाचे प्रमुख, जेजे रुग्णालय