तलावांत 44% साठा; यंदा पाणीटंचाई नाही!  pudhari photo
मुंबई

Mumbai lake water stock : तलावांत 44% साठा; यंदा पाणीटंचाई नाही!

दरवर्षी पाणीटंचाईचे टेन्शन असलेल्या मुंबईकरांना यंदा मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 44 टक्के म्हणजे 6 लाख 38 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नाही.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तलावांतील पाणीसाठा जवळपास 100 टक्केवर पोहचला होता. 2025 च्या तुलनेत यंदा 4 टक्क्याने म्हणजे 60 हजार दशलक्ष लीटरने पाणीसाठा जास्त होता. शहराला दररोज 3,950 दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा होतो. म्हणजे सरासरी मुंबईला महिन्याला 1 लाख 20 हजार दशलक्ष लीटर इतके पाणी लागते.

सध्याचा 6 लाख 38 हजार पाणीसाठा लक्षात घेता, किमान चार ते साडेचार महिने शहराला पुरेल इतके पाणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात महापालिकेला पाणी कपात करावी लागणार नाही. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचे टेन्शन असलेल्या मुंबईकरांना यंदा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहराला दररोज सरासरी 2 हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या भातसा तलावातही सुमारे 44 टक्के इतका पाणीसाठा आहे. सर्वाधिक 61 टक्के पाणीसाठा नॅशनल पार्कमधील विहार तलावात असून नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावात 51 टक्के इतका पाणीसाठा आहे.

ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलावात मात्र 37 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र मध्य वैतरणा तलावामध्ये 41 टक्के पाणीसाठा असल्यामुळे मोडक सागरचा पाणीसाठा कमी झाला तरी मध्य वैतरणातील पाणी मोडक सागर तलावात सोडून मुंबईत आणता येणार आहे. त्यामुळे आता पाण्याची चिंता सोडा, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.

20 मार्च तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

  • अप्पर वैतरणा 1,17,378 (51.70 टक्के)

  • मोडक सागर 48,128 (37.33 टक्के)

  • तानसा 57,087 (39.35 टक्के)

  • मध्य वैतरणा 79,799 (41.23 टक्के)

  • भातसा 3,14,731 ( 43.89 टक्के)

  • विहार 17,078 (61.66 टक्के)

  • तुळशी 3,911 (48.61 टक्के)

तीन वर्षांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

  • 20 मार्च 2024 4,99,964 (34.54 टक्के)

  • 20 मार्च 2025 5,78,298 (39.96 टक्के)

  • 20 मार्च 2026 6,38,111 (44.09 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT