Water Supply Pudhari
मुंबई

Mumbai Water Supply : मुंबईतील लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबणार !

जलवाहिन्यांवर बसणार बटरफ्लाय झडपा : जलवाहिनी फुटल्यानंतरही झडपा सहज होणार बंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर अत्याधुनिक बटरफ्लाय झडपा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी थांबणार असून जलवाहिनी फुटल्यानंतर उद्भवणाऱ्या आपत्कालीन काळातही झडपा बंद व उघडणे सहज शक्य होणार आहे.

मुंबई शहराला ठाणे व नाशिक जिल्ह्यातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिनींवर पाणी बंद व सुरू करण्यासाठी लोखंडी झडपा (व्हॉल्व्ह) बसवण्यात आल्या आहेत. या झडपा बंद करताना व उघडताना कामगाराला प्रचंड मेहनत करावी लागते.

एखादी जलवाहिनी फुटल्यानंतर उद्भवणाऱ्या आपत्कालीन काळात या झडपा तातडीने बंद करणे शक्य होत नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. यावर उपाय म्हणून महापालिकेने अत्याधुनिक बटरफ्लाय झडपा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात बांद्रा, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले व अंधेरी या भागातील जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवण्यात येणार आहेत.

पाणी उपसा यंत्रणा, शेतीचे सिंचन, सांडपाणी व्यवस्थापन आणि रासायनिक उद्योगांमध्ये बटरफ्लाय झडपा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. अन्य मोठ्या झडपांच्या उदा. गेट व्हॉल्व्ह तुलनेत बटरफ्लाय झडपा वजनाने हलक्या असतात. विशेष म्हणजे त्यांची किंमत कमी असते आणि वाहतुकीचा खर्चही वाचतो.

या झडपा केवळ ९० अंशात फिरवून पूर्णपणे चालू किंवा बंद करता येतात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत झडपा जलद गतीने बंद करणे सोपे जाते. याशिवाय झडपा झिजण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे देखभालीचा मोठा खर्च वाचतो. जलवाहिनीत खूप कमी प्रमाणात जागा व्यापत असल्याने या झडपा अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे मनपाच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करणे शक्य

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून त्यांचे फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर त्या जलवाहिनी मधून वाहणारा पाण्याचा प्रवाह थांबवणे आवश्यक असते. पाण्याचे प्रेशर मोठे असल्याने तेवढ्याच क्षमतेच्या झडपा बसवण्यात आल्या आहे. त्यामुळे या झडपा बंद करण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशावेळी जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करणे शक्य होत नाही. परंतु बटरफ्लाय झडपा अवघ्या काही मिनिटात बंद होणार असल्याने जलवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेणे शक्य होणार असल्याचे महापालिकेकडून करण्यात आले.

बटरफ्लाय झडपांचा प्रयोग यशस्वी

जलवान्यांवर या अगोदरही बटरफ्लाय झडपा प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्याने अशा प्रकारच्या झडपा अन्य जलवाहिन्यांवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT