Mumbai Water Metro Pudhari
मुंबई

Mumbai Water Metro: पहिली वॉटर मेट्रो मुंबईत दाखल; कॅन्डेला पी-12 बोटीच्या चाचण्या जूनमध्ये होणार

राज्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई वॉटर मेट्रोच्या ताफ्यातील पहिली अत्याधुनिक स्वीडिश इलेक्ट्रिक बोट मुंबई बंदरात दाखल झाली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या मार्गिका चाचण्यांना (ट्रायल्स) सुरुवात होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

राज्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वॉटर मेट्रोचा पर्याय पुढे आणला जात आहे.

त्यानुसार वॉटर मेट्रोच्या ताफ्यात इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित कॅन्डेला पी-12 ही बोट स्वीडनहून मागवण्यात आली आहे. ताशी 25 नॉट्‌‍स अर्थात 46 किमी वेगाने धावणारी ही बोट सध्या प्राथमिक चाचणीसाठी दाखल झाली आहे.

या बोटीची प्रवासी क्षमता 30 इतकी आहे. ही बोट इतर पारंपरिक डिझेल फेऱ्यांच्या तुलनेत 80 टक्के कमी ऊर्जा वापरते. शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही नौका पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि आवाजरहित आहे. त्यामुळे समुद्री पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

या पहिल्या 30 आसनी बोटीच्या यशस्वी चाचणीनंतर, 50 आणि 100 प्रवासी क्षमता असलेल्या आधुनिक बोटी आणण्यासाठी नॉर्वेमधील कंपन्यांशीही बोलणी सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आगामी काळात गेटवे ऑफ इंडिया परिसरासह मुंबईच्या किनारपट्टीवर दिसणाऱ्या पारंपरिक लाकडी बोटींच्या जागी नव्या विद्युत बोटी आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT