Mumbai Dam pudhari file photo
मुंबई

Mumbai Water Supply: मुंबईतील पाणीकपात लवकरच मागे घेणार; महापौरांचे संकेत

मुंबईच्या सातही जलाशयांत ९७ टक्के पाणीसाठा; १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर होणार.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यभरात दुष्काळाचे संकट असताना मुंबईकरांना मात्र पाण्याचा दिलासा मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात जलाशयांमध्ये ९७ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने मुंबईची पाणीकपात मागे घेण्यात येणार असल्याचे संकेत महापौर रितू तावडे यांनी दिले. त्या एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होत्या.

सध्या मुंबईच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा आहे. जून महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे तलावांतील पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली होती. ही पाणीकपात कधी उठणार आणि मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. आपण जी पाणीकपात लागू केली, ती मागे घेण्याची घोषणा लवकरच पत्रकार परिषद घेऊन करण्यात येईल. पुरेसा पाऊस झाल्याने आपले ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे नियोजन झाले आहे.

याशिवाय पाण्याचा राखीव साठादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे अडचण येणार नाही. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे. कारण एल निनोचा प्रभाव पाहता पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षी काय परिस्थिती होईल सांगता येत नाही.

महापालिकेच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा खात्यातर्फे मुंबईची पाणीकपात रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल.मुंंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही जलाशयांमध्ये सध्या ९७ टक्के म्हणजेच १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

२७ सप्टेंबर रोजीचा पाणीसाठा

मोडक सागर - ८५.७१ टक्के

तानसा - ९६.५० टक्के

अप्पर वैतरणा - ९६.६० टक्के

मध्य वैतरणा - ९८.७२ टक्के

भातसा - ९८.९३टक्के

विहार - १०० टक्के

तुळशी - ९९.७७ टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT