मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर व उपनगरातील 227 प्रभागांच्या हद्दी शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी मुंबईकरांना 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेची रखडलेली सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरअखेरीस जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी 227 प्रभागांची हद्द नव्याने निश्चित करण्यात आली आहे. मुंबईत एकसदस्यीय प्रभाग रचना असल्याने या प्रभागांमधून 227 नगरसेवक निवडून दिले जातील.
महानगरपालिकेने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला. आयोगाने त्यास मंजुरी दिल्यानंतर तो शुक्रवारी जाहीर करण्यात आला. प्रभागांची हद्द नव्याने निश्चित करताना फार मोठी तोडमोड करण्यात आली नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
प्रभाग रचना निश्चित करताना प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या कमी-जास्त असली तरी मतदारांची संख्या समान ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री उशिरा प्रभाग रचनेच्या प्रारूप अधिसूचनेचा 115 पानी दस्तऐवज हाती पडला. त्यानुसार मुंबईतील प्रभागांची लोकसंख्या साधारणत: 45 हजार ते 65 हजारदरम्यान ठेवण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने प्रारूप आराखड्याबद्दल नागरिकांना हरकती, सूचना वेळेत नोंदवता याव्यात, यासाठी महापालिका मुख्यालयासह पालिकेच्या 26 विभाग कार्यालयांमध्ये विशेष निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
या कार्यालयामध्ये प्रत्येक प्रभाग प्रारूप आराखड्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या प्रभागातील पूर्वीची हद्द व आताची हद्द यांची सांगड घालून काही हरकत अथवा सूचना असल्यास ती लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
घोषित प्रारूप प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असतील. यातील 40 प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. यातून एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात आंबेगाव- कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वांत मोठा (1,14,970) आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान (75,944) प्रभाग असेल. 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या 34 लाख 81 हजार 359 इतकी आहे. त्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे.
हरकती व सूचना विचारात घेतल्यानंतर या प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 32 प्रभागांची रचना जाहीर केली. चार सदस्यांचा एक प्रभाग असून, एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. नाशिक महानगरपालिकेच्या चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचनेनुसार 122 सदस्य संख्या कायम राहील. प्रभाग रचनेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 29 प्रभाग चार सदस्यी, तर 2 प्रभाग (15 आणि 19) हे तीन सदस्य असतील.
मुंबईतील प्रारूप प्रभाग रचनेत त्या त्या ठिकाणची लोकसंख्या आणि झालेला विकासात्मक बदल यानुसार फरक पडला आहे. प्रभागांच्या प्रामुख्याने हद्दी कमी-अधिक झाल्या आहेत. त्यावर हरकती, सूचना नोंदवण्याचा कालावधी 4 सप्टेंबर ( दुपारी 3 वाजेपर्यंत) हरकती व सूचना दाखल करणार्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी घोषित प्रारूप प्रभाग रचनेनुसार एकूण 122 जागांसाठी 31 प्रभाग असतील. 29 प्रभागांत 4 सदस्य असणार आहेत, तर 2 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्य असणार आहेत.