वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थित खेळाडू. file photo
मुंबई

Mumbai Wankhede Stadium | वानखेडेने अनुभवली.. एक रात्र मंतरलेली...

हृद्य आठवणींनी स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याची सांगता

पुढारी वृत्तसेवा

मुंबईः आजवर अनेक दिवस-रात्र सामन्यांसाठी वानखेडे स्टेडियम विद्युत रोषणाईने सजल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, रविवारची रात्र त्याला अपवाद होती. कुठलाही क्रिकेट सामना नसूनही स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. निमित्त होते या जगप्रसिद्ध स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे.

मुंबईच्या आजी-माजी क्रिकेटपटूंना याची देही याची डोळा पाहताना त्यांच्या आठवणी ऐकताना उपस्थित क्रिकेट स्टार्स आणि क्रिकेटप्रेमी भारावून गेले. वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थित खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर त्यांनी संपूर्ण वानखेडेवर फेरी मारत चाहत्यांची भेट घेतली. यावेळचे दृश्य अविस्मरणीय होते. सचिन, सचिन... रोहित, रोहित.. अशा आवाजाने संपूर्ण वानखेडे दुमदुमले. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून भारताचे कर्णधारपद भूषवलेल्या मुंबईच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडलजी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळचा सर्व दिग्गज खेळाडूंसोबतचा संवाद उपस्थितांना आवडला.

विक्रमवीर सुनील गावस्कर यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले की, वानखेडेपूर्वी सीसीआयच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर सामने व्हायचे. मात्र, वानखेडे स्टेडियम आणि माझे वेगळे नाते आहे. ते माझे पहिले प्रेम आहे. मुंबई क्रिकेटचे होमग्राउंड आहे. तिथे खेळण्याचा आणि मोठी खेळी करण्याचा वेगळा अभिमान होता. माजी महिला कर्णधार डायना एडलजी यांनी त्यांचे सुरुवातीचे अनुभव कथन करतानाच, माझ्यापूर्वी केवळ गावस्कर खेळले असे सांगत गावस्कर यांच्या मुंबई आणि भारताच्या क्रिकेटमधील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. महिला क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यात तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली, हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. रवी शास्त्री यांनी त्यांच्या सलग सहा षटकारांच्या आठवणी कॉमेन्ट्रीच्या रूपाने सादर केल्या. त्यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. २०११ वर्ल्डकप जिंकल्याचा मोठा आनंद आहे, असे सचिन तेंडुलकर म्हणाला. वर्ल्डकप जिकण्याचे उद्दिष्ट घेऊनच क्रिकेटमध्ये आलो. त्याची प्रेरणा कपिल देव यांच्याकडून मिळाली होती. अनेक विक्रम रचले तरी वर्ल्डकप जिंकला नसता तर माझी कारकीर्द शून्य होती, असे तो म्हणाला. या कार्यक्रमात यंदा पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा करंडक आणण्यात आला. या करंडकाबरोबर स्टेजवर उपस्थित भारताच्या दिग्गजांनी फोटोही काढला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि सर्व भारतीयांचा पाठिंबा असेल, असेही यावेळी कर्णधार रोहित शर्मान सांगितले. विद्यमान रणजी कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही त्याचे अनुभव कथन केले.

सुनील गावस्कर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान सुनील गावस्कर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. गावस्करांना येत्या १० जुलैमध्ये ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. केक कापून आणि बॉलीवूड गायक शेखर रावजियानी याच्या गाण्यासह त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT