मुंबई : ठाणे, नाशिक, पालघर, रायगड या जिल्हयात पावसाचा जोर वाढल्याने शेजारील मुंबई शहरातील बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली. परिणामी सर्वप्रकारच्या भाज्यांचा सरासरी प्रतिकिलो दर 60 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत गेला आहे.
मुंबई शहराची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून दादर ओळखली जाते. याठिकाणी नवी मुंबई, ठाणे, पालघर व नाशिक, रायगड जिल्ह्यातून दैनंदिन भाज्यांची आवक होते. या जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. सध्या बाजारात हिरवा वटाणा 140 रुपये प्रतिकिलो, सिमला (ढब्बू मिरची), गवार, भेंडी प्रतिकिलो 100 रुपये, वांगी, कारले, दोडका , तोंदली 80 रुपये तर चवळी शेंग, बिनीस, काकडी 60 रुपयांसह मेथी 30 रुपये पेंडी, कोबी गड्डा 25 रुपये असे दर आहेत.
आवक कमी झाल्याने दरात दुपटीने वाढ झाली आहे. मात्र; कोथिंबीर, कांदापात पेंढी दर स्थिर आहेत. कोथिंबीरची पेढी 20 रुपये तर दोन पेढ्या 30 रुपयांना असा त्याचा दर होता. तसेच सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा चाकवत, पुदिना याची पेंढी दहा रुपयांना होती. टोमॅटो 50 रुपये तर हिरवी मिरची 80 रुपये प्रतिकिलो इतकी होती.
गेल्या आठवड्यात भाजीपाल्याचा दर निम्मा होता. पावसाचा जोर वाढल्याने शेतीमधील पिके पाण्याखाली गेली आहेत. भाज्यांची आवक कमी झाल्याने मुंबईत भाजीपाल्याचा प्रतिकिलो दर हा दुपट झाला आहे. नाशिक, पुणे जिल्यातील मंचर व सुरतमधून भेंडीची आवक होते. दुसरीकडे मुंबईपेक्षा नाशिक येथे भाजीपाल्याचा प्रतिकिलो दर 10 ते 15 रुपये जास्त आहे. यापुढे पाऊस वाढला तर भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यताही व्यापार्यांनी व्यक्त केली.