मुंबई : वाढत्या महागाईचा फटका आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या झणझणीत वडापावला देखील बसला आहे. वडापावसाठी अत्यंत आवश्यक असलेला पाव ३७ पैशांनी महागला असून वडापाव दोन तर काही ठिकाणी तीन रुपयांनी महागला आहे. पाठोपाठ आता पाव भाजीदेखील महागणार आहे.
सध्या एक वडापाव १५ ते १६ रुपयांना मिळतो. त्याची किंमत आता १८ ते २० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. साधे वडापावविक्रेते एक वडापाव १२ रुपयांना विकतात. हा वडापाव १४ ते १५ रुपये किंमतीला मिळू शकतो. पावभाजीही महागणार आहे. पावभाजी एक प्लेट सध्या १२० रुपयांना मिळते. त्याच्या किमतीतही वाढ होणार आहे
बेसन, कांदे, लसूण, तेल यांचे वाढलेले दर देखील या वाढलेल्या दरांना कारणीभूत असल्याचे मानले जाते. मुंबईकरांची अडीअडचणीला पोट भरण्याची हमखास हमी देणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांचे वांधे होणार आहेत. रस्त्यावर वडापावाच्या गाड्यांवर सहज मिळणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना आता जादा पैसे मोजावे लागतील. वडापावची दरवाढ काही ठिकाणी मंगळवार २४ डिसेंबरपासूनच तर काही ठिकाणी बुधवारपासून अमलात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बेकरी असोसिएशनने ख्रिसमस नाताळच्या पूर्वसंध्येलाच पावाची दरवाढ केली. त्याचा फटका वडापावाला देखील बसला. एका पावाच्या किमतीत ३७ पैशांची वाढ झाली आहे. याचा अर्थ आता आठ पावांच्या एका लादीला तीन रुपये जादा मोजावे लागणार आहेत. यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल महागल्यानंतर आता पावाची दरवाढ झाल्याने वडापावची किंमत वाढवावी लागली, असे चंदनवाडी, चिराबाजार येथील वडापाव विक्रेते कृष्णा किळंजे यांनी पुढारीला सांगितले.
बदलापूर बेकरी असोसिएशननेदेखील पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने आठ पावांच्या लादीत २४ डिसेंबरपासून तीन रुपयांची दरवाढ केली. यापूर्वी २० रुपयांना मिळणारी लादी आता २३ रुपयांना घ्यावी लागत आहे. एका पावाच्या किमतीत ३७ पैशांची दरवाढ झाली असली तरी वडापावचे दर मात्र २ ते ३ रुपयांनी वाढवले आहेत.
२०२३ पर्यंत मैद्याचे ५० किलोचे पोते १२०० ते १४०० रुपयांना मिळत होते. ते आता १६०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणारे सामानही महागले. डिझेल दरवाढीने वाहतूक महागली व पर्यायाने सर्वच गोष्टी महाग होत चालल्या. पावाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचा खर्चही वाढला.- सुनील वाडेकर, वडापाव विक्रेते, चेंबूर स्टेशनजवळ