जेएनपीए : महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिटफंड घोटाळा उरण तालुक्यात झाला. ही घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील सोनारी गावात एका शेअर मार्केट स्कीमच्या माध्यमातून दोघा भावांनी नागरिकांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. नागरिकांची सुमारे 40 कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सोनारी गावात राहणारे अभिजीत तांडेल व वेदक तांडेल हे दोघेही सख्खे भाऊ असून त्यांनी द सीक्रेट ट्रेडिंग स्किम नावाचे शेअर मार्केट चालवित असल्याचे सांगून या स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास आठ ते दहा टक्के नफा देण्याचे आश्वासन देत विविध नागरिकांना आमिष प्रलोभने दाखवले. शेअर मार्केट वर आधारित द सीक्रेट ट्रेडिंग स्कीममध्ये पैसे गुंतवणूक केल्यास उत्तम नफा मिळवून देण्याचे आश्वासन नागरिकांना अभिजीत तांडेल व वेदक तांडेल यांनी दिल्याने नागरिकांनी आपली लाखो करोडो रुपये द सीक्रेट ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवली होती. अनेक नागरिकांनी रोख हातात पैसे देऊन तर काही जणांनी त्यांना चेक किंवा बँक द्वारे पैसे दिले. कोणी 67 लाख दिले तर कोणी 75 लाख तर कोणी 15 लाख रुपये दिले असे विविध लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत.
या शेअर मार्केटची स्कीमची माहिती देण्यासाठी अभिजीत तांडेल व वेदक तांडेल यांनी अनेक गावात त्यांच्या मर्जीतली विश्वासातील अशी माणसे घेऊन त्यांची एजंट म्हणून नेमणूक केली. या एजंटने गावागावात या स्कीमची माहिती देण्यास सुरुवात केली. एजंटने ग्राहक आणल्यास, पैसे गुंतवल्यास त्यांना कमिशन मिळायचे.
कालांतराने जेव्हा लोक आपला परतावा, आपली रक्कम त्यांच्याकडे मागू लागले तेव्हा ते वेगवेगळी कारणे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ करायचे तसेच नागरिकांचे पैसे देण्याची वेळ आली की ते कुठेतरी निघून जायचे. वारंवार मागणी करूनही आपला पैसा मिळत नसल्याने नागरिकांनी पैसा घेण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावला. मात्र त्यांना गुंतविलेले पैसे परत भेटत नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिकांनी सोनारी गावातील अभिजीत तांडेल, वेदक तांडेल यांनी केलेल्या फसवणूक विरोधात न्हावा शेवा पोलिस स्टेशनला धाव घेतली. गावातील अभिजीत दयानंद तांडेल, वेदक दयानंद तांडेल या दोघा सख्ख्या भावांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक सांगून हेतूपरस्पर, जाणूनबुजून नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलीसांतर्फे दोघा भावांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.