मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हलगर्जीपणामुळे एलएलबी (तीन वर्षे) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ‘टॅक्सेशन लॉ’ या विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे उत्तरे लिहूनही गुण न दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन मूल्यमापनात ‘एनए’ (नॉट अस्सेस्ड) अशी नोंद करत 75 पैकी 50 गुणांची उत्तरेच तपासली नसल्याचे समोर आले आहे.
दीड महिन्यांपूर्वी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी छायांकित उत्तरपत्रिकांची मागणी केली. उत्तरपत्रिकेतील अनेक उत्तरांना गुणच दिले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरपत्रिकेतील 75 पैकी जवळपास 50 गुणांच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी सविस्तर उत्तरे लिहिलेली असतानाही त्या प्रश्नांचे मूल्यमापनच झालेले नाही.
उत्तरपत्रिकेच्या शेवटी प्रश्नांच्या समोर गुणांची माहिती देताना निम्याहून अधिक प्रश्नांना ‘एनए’ असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे मूल्यमापनच टाळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही, आमच्या संपूर्ण करिअरचा प्रश्न आहे. बार कौन्सिलची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना, या गोंधळामुळे आम्हाला पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नाही. विद्यापीठाच्या या घोळामुळे करिअर अडचणीत आले आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
हा प्रकार गंभीर असल्याचे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते अॅड. सचिन पवार म्हणाले. ऑनलाइन परीक्षा, गुणपत्रके आणि आता उत्तरपत्रिका मूल्यमापनातच अशी चूक होणे ही प्रणालीतील गंभीर त्रुटीचे लक्षण आहे. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंबंधी पुनर्तपासणी सुरु असून नव्याने निकाल जाहीर करण्यात येईल असे परीक्षा विभागाने सांगितले.
सर्व उत्तरपत्रिकांचे मोफत पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे.
‘एनए’ लिहलेले प्रश्न तपासून योग्य गुण द्यावेत
दोषी प्राध्यापक व मूल्यांकन पद्धतीबाबत चौकशी करून कार्यवाही करावी
सुधारित गुणपत्रक त्वरित विद्यार्थ्यांना द्यावे