11th admission  file photo
मुंबई

Mumbai University Admission: पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत कट-ऑफमध्ये घट!

नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्ल होण्याच्या मार्गावर असून अनेक महाविद्यालयात तिसरी यादीत कमी प्रवेश होतील अशी स्थिती तयार झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई विद्यापीठाशी संलग्न पदवी महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत 80 ते 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक अभ्यासक्रमांचे कट-ऑफ गुण कमी झाले आहेत. नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्ल होण्याच्या मार्गावर असून अनेक महाविद्यालयात तिसरी यादीत कमी प्रवेश होतील अशी स्थिती तयार झाली आहे.

पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. 80 ते 90 टक्केच्या आतच कटऑफ पहायला मिळाले असून यादरम्यान गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची प्रतिक्षा करावी लागली आहे. यामुळे तिसरी यादी जाहीर होईपर्यंत एफवाय प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक दिसणार आहे. पहिल्या यादीत काही अभ्यासक्रमांचे कट-ऑफ वाढले होते.

त्यामुळे 80 ते 90 टक्के असे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांनी कट-ऑफ कमी झाल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर काही महाविद्यालयांचे कट-ऑफ पहिल्या यादीप्रमाणे कायम आहेत.

विशेषतः विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांच्या कट-ऑफमध्ये लक्षणीय घट झाली आहे. रुईया महाविद्यालयातील बीएससी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाचा पहिल्या गुणवत्ता यादीतील कट-ऑफ 80 टक्के होता. तो दुसऱ्या यादीत 76 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कट-ऑफ पहिल्या यादीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी घसरला आहे, तर कला शाखेचा कट-ऑफ पहिल्या यादीइतकाच कायम राहिला आहे.

दरम्यान, पहिल्या गुणवत्ता यादीतील उच्च कट-ऑफमुळे सरासरी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळविणे कठीण होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (बीएएफ), बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स (बीबीआय) आणि बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) या अभ्यासक्रमांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, वाणिज्य शाखा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रत्यक्ष कट-ऑफ काही प्रमाणात कमी झाले आहेत. हा कल कायम राहण्याची शक्यता असून तिसरी गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांना आणखी दिलासा देऊ शकते. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. काही मोजक्या लोकप्रिय अभ्यासक्रमांवर अवलंबून राहण्याऐवजी आता विविध अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने विद्यार्थी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत.

विले-पार्ले येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देत असल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेचे कट-ऑफ कमी दिसून येत आहेत. मात्र, जैवतंत्रज्ञान, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या व्यावसायिक विज्ञान अभ्यासक्रमांना पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक मागणी असल्याने त्यांचे कट-ऑफ तुलनेने जास्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT