मुंबई : मुंबईतील एका वृद्ध व्यापार्याने डिजिटल अॅरेस्टमध्ये 58 कोटी रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी या व्यापार्याला मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्याच्या खात्यातून दोन महिन्यांत 58 कोटी वळते करून घेतले.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मालाड येथील अब्दुल खुळी (47), अरुण कडव्हासरा (55) आणि त्याचा भाऊ जेठाराम (35, रा.मुंबई सेंट्रल) अशी त्यांची नावे आहेत. 19 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. अधिकार्यांनी सांगितले की, सायबर चोरट्यांनी व्यापारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. त्यांना अटक केल्याचे सांगताच त्यांची भीतीने गाळण उडाली. अटक टाळायची असेल तर सांगतोय त्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. अटकेच्या भीतीने या व्यापार्याने दोन महिन्यांच्या काळात आरटीजीएसद्वारे 58 कोटी रुपये हस्तांतरित केले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दाम्पत्याने सायबर पोलिस विभागाकडे संपर्क साधला. सायबर विभागाने भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित तरतुदीनुसार मागील आठवड्यात प्रकरण नोंदविले. तपासादरम्यान हे पैसे किमान 18 बँक खात्यांमध्ये हस्तांतरित झाल्याचे लक्षात आले. अधिकार्यांनी सांगितले. त्यांनी संबंधित बँकांशी तत्काळ संपर्क साधून संबंधित खात्यातील रक्कम गोठवण्याची सूचना केली, असे तपास अधिकार्यांनी सांगितले.