नेरळ : कर्जत जवळच्या पाली भूतिवली धरणा क्षेत्र परिसरात शनिवारी मुंबई येथून आलेल्या तीन पुरूष व एक महिला अशा असे चार पर्यटकांपैकी एक पुरुष व महिला दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उत्तरले असता, बुडू लागले. त्यावेळी येथे नौकाविहाराचा व्यवसाय करणारे जेत्स्की क्लबचे चालक संस्थापक मुतालिक लियाकत सय्यद यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्परता दाखवून तत्काळ आपल्या बोटी जवळ जावून त्या दोघांना आपल्या नौकेत घेवून त्यांचा प्राण वाचवले आहे. सय्यद यांचे सर्वत्र कौतूक होते आहे.
या सर्व प्रकारामुळे हे पर्यंटक पुर्णपणे घाबरुन गेले होते. त्या दोघांना किनाऱ्यावर आणल्यावर ते भांबावलेले होते. काही वेळाने नॉरमल झाल्यावर हे चौघे पर्यटक आपल्या कारमधून लगेच मुंबईस निघून गेले. या घाईगडबडीत मला त्यांचे नाव देखील विचारता आले नाही. या घटनेची नोंद पोलीसांकडे देखील झालेली नसल्याची माहिती मुतालिक लियाकत सय्यद यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
या धरणामध्ये या आधी देखील अशा हौशी व पोहण्याचा आनंद घेणाऱ्या अनेक पर्यटकांना धरण क्षेत्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या धरण क्षेत्रात आपला जीव गमावण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जलसंपदा व पाटबंधारे रायगड विभागाकडून धरण क्षेत्रातील पाण्यात उत्तरू नये अशा सुचनांचे फलक लावले आहे. मात्र काही पर्यटक याकडे दुर्लक्ष करीत असतात. तर आम्ही पर्यटकांना पाण्यात न उतरण्याच्या सुचना करतो, मात्र काही पर्यटक न ऐकता उलट , दादागिरीची भाषा वापरतात. पोलीसांनी सुचना दिल्यास व पोलीसांनी अशा पर्यटकांविरोधात कार्यवाही केली तर अशा दुर्दैवी बुडण्याच्या घटनांना आळा बसेल, असे मुतालिक लियाकत सय्यद यांनी अखेरीस सांगीतले.