मुंबईला चार वर्षांत मिळणार गारगाई धरणातून पाणी pudhari photo
मुंबई

Gargai Dam Mumbai : मुंबईला चार वर्षांत मिळणार गारगाई धरणातून पाणी

मुंबईकरांना डिसेंबर २०३० पर्यंत गारगाईतून दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असली तरी, पावसाळ्यानंतर या कामाचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प अवघे चार वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना डिसेंबर २०३० पर्यंत गारगाईतून दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

चितळे कमिटीच्या शिफारसीनुसार पालिकेने २०११ पूर्वी वैतरणा नदीवर गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणी व पालिका प्रशासनाची उदासीनता यामुळे प्रकल्प सत्यात उतरला नाही. परंतु आता गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाला चालना मिळाली असून या प्रकल्पा अंतर्गत धरण बांधण्यासाठी कंत्राटदाराची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे व २७९.४ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. त्यानंतर या धरणातील पाणी मुंबईत आणण्यासाठी १.६ किमी लांबीचा बोगदा बांधण्यासह अन्य पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका ओघदे गावानजीक विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या धरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अवघ्या चार वर्षात या धरणाचे काम पूर्ण करून, मुंबईला पाणीपुरवठा सुरू करण्याचे टार्गेट ठेवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अभियंताने सांगितले.

गारगाई प्रकल्पासाठी ६५७ हेक्टर जमीन संपादन करण्यात आली असून धरण क्षेत्रातच ३ लाख झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

कोयना धरणातून पाणी आणण्याचाही आग्रह

मुंबई शहरातील पाण्याची गरज भागविण्याकरिता, कोयना धरणाचे आणि कोकण परिसरातील वाहून जाणारे पाणी मुंबई शहराकडे वळविण्यात यावे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी राज्य व केंद्र शासनाकडून मिळविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आयुक्तांमार्फत समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना स्थायी समिती सदस्य प्रकाश दरेकर यांनी केली आहे. याबाबत काय निर्णय घ्यावा हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT