Mumbai Tiranga Rally  Pudhari
मुंबई

Mumbai Tiranga Rally : जल्लोष सभेत मनसे नेते संदीप देशपांडेंचा अनोख्या टी-शर्टमधून PM मोदींवर निशाणा

आंदोलन हा सुद्धा लोकशाहीचा उत्सव असल्याचा 'जेन-झी'ने दिलेला सर्वात मोठा संदेश

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Tiranga Rally : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज (दि.२६) ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वतीने भव्य 'जल्लोष सभेचे' आयोजन करण्यात आले होते. या जल्लोष सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेला अनोखा टी-शर्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या टी-शर्टच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

टी-शर्टची सर्वाधिक चर्चा

विद्यार्थ्यांच्या (जेन-झी) तीव्र आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या ऐतिहासिक विजयाचे स्वागत करण्यासाठी आज शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या वतीने जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती.

सरकारबद्दल असलेली भीती मुलांनी घालवली

यावेळी 'पुढारी न्यूज'शी बोलताना देशपांडे यांनी या टी-शर्टमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "निश्चितच, मला असं वाटतं की या आंदोलनातनं सर्वात मोठा टेक-अवे (Takeaway) हाच आहे की, सरकारबद्दल असलेली भीती या मुलांनी घालवलेली आहे. टी-शर्टबद्दल म्हणाल, तर जेन-झींनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, त्यांची वेगवेगळी पोस्टर्स होती; त्यातनंच प्रेरणा घेऊन बनवलेला हा टी-शर्ट आहे."

आंदोलन हासुद्धा लोकशाहीचा उत्सव!

"आजचा जो विजयाचा जल्लोष आहे, तो त्या मुलांचा जल्लोष आहे आणि त्याच्यात आम्ही फक्त सामील होणार आहोत. कॉकरोच जनता पार्टीचं तुम्ही बघताय. आंदोलन कशा नव्या पद्धतीने करावं याची प्रेरणा सर्वच राजकीय पक्षांनी या जेन-झींकडून घेतली पाहिजे. आंदोलन म्हणजे फक्त सिरिअस गोष्टी किंवा गंभीर वातावरण नाही, तर आंदोलन हासुद्धा लोकशाहीचा एक उत्सव आहे. नुसत्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव नाही, तर आंदोलन हासुद्धा लोकशाहीचा उत्सव आहे, हा मला वाटतं या आंदोलनातला सर्वात मोठा संदेश आहे," असेही देशपांडे यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT