दुस-या दिवशीही सीएनजी टंचाई pudhari photo
मुंबई

Mumbai CNG shortage : दुस-या दिवशीही सीएनजी टंचाई

रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब जागीच उभ्या, महामुंबईचे हाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीचा तुटवडा कायम राहिल्याने सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रिक्षा, टॅक्सी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची धावाधाव झाली. आता मंगळवारी दुपारपर्यंत सर्व सीएनजी पंपांचा गॅसपुरवठा पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

आरसीएफ कंपाऊंडमधल्या मुख्य सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाला आणि वडाळा येथील महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा घटला. त्याचे थेट पडसाद संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात उमटले. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसला. मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 389 सीएनजी पंपांना याचा फटका बसला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी, तसेच बेस्टच्या काही बसेस सीएनजीवर चालतात. यातील बहुतांश वाहने रविवारपासून टप्प्याटप्प्याने जागीच थांबली.

घरगुती गॅसच्या ग्राहकांना पाइपद्वारे पीएनजीचा पुरवठा सुरू राहील, असे एमजीएलने स्पष्ट केले. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा खंडित झाला नाही. मात्र, वडाळा गॅस स्टेशनला होणारा पुरवठाच थांबल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील सीएनजी पंप सुरू नसल्याचे एमजीएलने मान्य केले.

परिणामी, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प झाली. रविवारी दुपारपासून पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅस पोहोचलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना सीएनजीसाठी तासन्‌‍तास रांगेत उभे राहावे लागले आणि तरीही गॅस मिळाला नाहीच. बहुतांश सीएनजी स्टेशन्स/पंप पूर्णपणे बंद होते.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या अनेकांना याचा फटका बसला. सीएनजीअभावी रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमी होती. प्रवाशांसह शाळेत जाणाऱ्या मुलांनाही याचा फटका बसला.

स्कूलबस ठप्प; विद्यार्थी-पालकांची तारांबळ

रविवारी दुपारपासून बंद झालेल्या सीएनजी गॅस पुरवठ्याचा तीव्र फटका सोमवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळांच्या बससेवांना बसला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या शाळांच्या बसमध्ये सीएनजीचा साठा संपल्यानंतर दुपारच्या सत्रातील अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाहीत. सकाळच्या सत्रात शिल्लक गॅसवर बससेवा पुरवता आली असली तरी दुपारनंतर मात्र स्कूल बसेस बंद राहिल्याने पालकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागले.

अनेक पालकांना कामाच्या वेळेत धावपळ करावी लागली. काहीजणांना मुलांना शाळेत सोडून उशिरा कामावर पोहोचावे लागले तर काहींना रजा घ्यावी लागली. या गोंधळात रिक्षाचालक आणि खासगी वाहतूकदारांनी होणाऱ्या असुविधेचा फायदा घेत पालकांकडून मनमानी भाडे आकारले. नियमित मीटरने 40 ते 50 रुपये होणाऱ्या अंतरासाठी रिक्षाचालकांनी 300 ते 350 रुपये मागितल्याचे समजते. खासगी मिनी बस कंपन्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत किंवा घरी सोडण्यासाठी 1200 रुपयांपर्यंत भाडे आकारले.

आज दुपारपर्यंत पुरवठा पूर्ववत?

गेल कंपनीच्या सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सोमवारी संध्याकाळपर्यंतही पूर्ण झालेले नव्हते. पंपांवर वाहनचालक रांगा लावून तिष्ठत राहिले. मात्र, महामुंबई प्रदेशातील 389 पैकी 225 सीएनजी पंप कमी दाबाने सोमवारी रात्री सुरू झाले. पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वडाळ्यातील सीटी गेट स्टेशनचा गॅरपुरवठा पूर्ववत होईल आणि मंगळवारी दुपारपर्यंत सर्व सीएनजी पंप पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे महानगर गॅसकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT