मुंबई: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात गारवा वाढला असून मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे. शहरात किमान तापमान १६.२ अंशांवर घसरले असून, चालू हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी तापमान ठरल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
मुंबईत आदल्या दिवशी २१ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान २४ तासांत घसरून १६.२ अंशांवर आले. म्हणजेच एका दिवसात ४.८ अंशांची घट झाली आहे.
याशिवाय महाड येथे १४.७, विरार येथे १४.८, चिपळूण येथे १४.९, पनवेल येथे १५.२, उत्तन येथे १५.५, डहाणू येथे १५.६, ठाणे येथे १५.९, नवी मुंबई येथे १६ आणि रत्नागिरी येथे १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार सुकसाळे येथे सर्वात कमी म्हणजे
११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल शहापूर येथे १२.५, सावर्डे येथे १२.८, बदलापूर येथे १२.९, नेरळ येथे १३, पालघर येथे १३.२, कर्जत येथे १३.३ आणि भातसानगर येथे १३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले..
रविवारी (दि. २२) उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवली. जळगाव, निफाडचे किमान तापमान ६.५ अंशांपर्यंत खाली आले होते. पहाटेच्या दाट धुक्यामुळे या भागातील दृष्यमानता पहाटेच्या वेळी खूप कमी झाली आहे. त्यापाठोपाठ सातारा, पुणे, वाशिम जिल्ह्यांचे तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत खाली आले होते.
राज्यात यंदाच्या हिवाळ्यात उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक गारठत आहे. दोन दिवसांपूर्वी निफाडचे किमान तापमान हंगामात प्रथमच नीचांकी ६.९ अंशांवर गेले होते. त्यापाठोपाठ जळगावचा पारा ८ अंशांवर होता. रविवारी जळगाव अन् निफाडचे तापमान ६.५ अंशांवर होते.