Mumbai teacher BLO duty pudhari photo
मुंबई

Mumbai teacher BLO duty: मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना बीएलओसह जनगणनेचेही काम

शिक्षण सेवकांची कार्यकर्ते उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकांकडे याचना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अनेक शिक्षकांची निवडणुकीच्या कामामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली आहे. या शिक्षकांना मतदार यादी सखोल पुनरिक्षण कामाबरोबरच जनगणनेचे कामही लावण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांकडून थेट स्थानिक नगरसेवकांकडे मदतीची याचना करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मतदार यादी सखोल पुनरिक्षणाचे काम सुरू आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील जवळपास दोन ते अडीच हजार शिक्षक व शिक्षण सेवकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कामासोबतच जनगणनेचे काम आणि परीक्षांचा निकाल अशी तिहेरी जबाबदारी शिक्षकांवर अल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिहेरी कामाची जबाबदारी आल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शिक्षक निवडणुकीच्या कामावर असल्याने मुख्याध्यापकांना शाळेत असलेल्या शिक्षकांच्या मदतीने निकाल लावण्याची कसरत करावी लागत आहे.

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त शिक्षण सेवकांकडून मात्र अजब शक्कल लढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामामध्ये मदत करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून कार्यकर्ते देण्याची विनंती करण्यात येत आहे. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळक नगर, कुर्ला या परिसरातील अनेक शिक्षण सेवकांनी नगरसेवकांना दूरध्वनी केला आहे. काही नगरसेवकांनी या शिक्षण सेवकांची मागणी मान्य करत त्यांच्या मदतीला कार्यकर्तेही उपलब्ध केले आहेत.

मुंबई पालिकेच्या शाळांमधील जुने शिक्षक हे प्रमाणिकपणे निवडणुकीचे काम करत असताना नव्याने नियुक्त झालेल्या या शिक्षण सेवकांनी थेट मुख्याध्यापकांकडूनच स्थानिक नगरसेवकांचा दूरध्वनी क्रमांक घेतला आहे. मात्र नगरसेवकांनी हा मुद्दा पालिकेच्या सभागृहात उपस्थित केल्यास संबंधित मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. अनोख्या शक्कलीमुळे संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सफाई कामगारांनाही जनगणनेची ड्युटी

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत जनगणना करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. एवढ्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांचीही जनगणनेसाठी नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामगार संघटनांसह शिक्षित कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय पातळीवर चतुर्थ श्रेणी कामगारांना या कार्यासाठी त्यांची अर्हता लक्षात न घेता, त्यांच्या इच्छेविरुद्ध पाठविण्यात येत आहे. याला दि म्युनिसिपल युनियनने आक्षेप घेतला आहे. पालिकेने सफाई कामगार व अन्य ड वर्गातील कामगारांची जनगणनेसाठी नियुक्ती करून पारदर्शकता व अचूक जनगणनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याचा आरोप कामगार नेते रमाकांत बने यांनी केला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT