मुंबई: पेट्रोल, डिझेलचे दर आठ दिवसांत चार वेळा वाढले आणि याच महिन्यात महामुंबई प्रदेशात सीएनजीचेही दर भडकले. परिणामी, काली-पिली टॅक्सीसह ॲप आधारित कॅबचे मीटरही कोणत्याही क्षणी वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी राजधानी दिल्लीत सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढले. राष्ट्रीय राजधानीच्या प्रदेशात सीएनजीचा किलोचा दर आता 83 रुपये 9 पैसे झाला आहे. ही दरवाढ महामुंबई प्रदेशात मात्र लागू झालेली नाही. हा दिलासा असला तरी गेल्या 14 मे रोजी महानगर गॅसने केलेल्या दरवाढीत महामुंबईतही सीएनजीचा किलोचा दर दोन रुपयांनी वाढला. एक किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागत आहेत.
ॲप-आधारित कंपन्यांचे प्रवासी भाडे मात्र, गेल्या 2 वर्षापासून प्रति किलो मीटर वाढलेले नाही.काळी-पिवळी टॅक्सीचे आणि ॲाटो रिक्षांचेही मीटर दर वाढवलेले नाहीत. पेट्रोल 111 रुपयांच्या वर आणि डिझेल आता 100 च्या जवळपास जात आहे. याचा फटका प्रवासी व मालवाहतूक आणि शहरातील ऑटो रिक्षाचालकांना बसत असून, प्रवासी दर वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नवीमुंबई तळोजा येथील कॅबचालक आकाश बा.गायकवाड म्हणाले, सध्या सीएनजीचा दर तब्बल 84 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र; ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जसे ओला,उबर, आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कंपन्यांचे प्रवासी भाडेदर दोन वर्षांपूर्वीप्रमाणेच 14 ते 16 रुपये प्रतिकिमी आहेत. सीएनजी दरवाढ, वाहनाची देखभाल, विमा, कमिशन, उन्हाळ्यात सतत ए.सी. लागत असल्याने इंधन खर्च अधिक वाढतो. या तुलनेत मिळणारा मोबदला तुटीचा आहे.
एसटीच्या भाडेवाढीचे परिवहन मंत्र्यांचे संकेत
सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या दरांचा मोठा फटका आता राज्य परिवहन महामंडळाला बसू लागल्यामुळे भविष्यात एसटीला भाडेवाढ करावी लागेल, असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत डिझेलच्या किमतीत 4 वेळा वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या खर्चात 310 कोटी रुपयांची भर पडली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत या वाढत्या आर्थिक तणावाची माहिती दिली.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारकडून मदत मिळाली नाही तर भविष्यात काही प्रमाणात भाडेवाढ करावी लागू शकते. एसटी महामंडळाचा याआधी डिझेलवरील वार्षिक खर्च सुमारे 3300 कोटीरुपये होता. मात्र, डिझेल दरवाढीनंतर हा खर्च वाढून जवळपास 3610 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.