मुंबई : कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ओढाताण आणि करिअरच्या अनिश्चिततेमुळे महानगरातील युवक मानसिकदृष्ट्या खचत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालानुसार, देशातील प्रमुख शहरांमधील आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. देशातील प्रमुख 53 शहरांतील आत्महत्यांच्या यादीत मुंबई तिसऱ्या स्थानी आहे.
एनसीआरबीच्या 2024 च्या आकडेवारीनुसार, दिल्ली (2,905) आणि बंगळुरू (2,403) नंतर मुंबईत सर्वाधिक 1 हजार 406 आत्महत्यांची नोंद झाली आहे. मुंबईचा आत्महत्येचा दर प्रति लाख लोकसंख्येमागे 11 असला तरी महानगरातील बदलती जीवनशैली व सामाजिक अपेक्षांचे ओझे जीवघेणे ठरत असल्याचे दिसत आहे.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांचे प्रमाण 71 टक्क्यांहून अधिक आहे. 1 हजार 616 विवाहित मृतांमध्ये 1 हजार 162 पुरुष आणि 454 महिलांचा समावेश आहे. कुटुंब चालवण्याचा ताण, नोकरीतील अस्थिरता व सामाजिक प्रतिमेच्या ओझ्याखाली पुरुषांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार आत्महत्याग्रस्तांमध्ये 745 बेरोजगार आणि 343 रोजंदारी मजुरांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महागाई आणि कर्जाचा ताण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी तब्बल 1 हजार 258 जणांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी होते. याउलट उच्च उत्पन्न गटात आत्महत्येचे प्रमाण नगण्य आहे.
मुंबईत 378 विद्यार्थ्यांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या वर्गात आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. बारावीपर्यंतच्या 537, तर दहावीपर्यंतच्या 525 जणांनी मृत्यूला कवटाळले. पदवीधरांमध्ये हे प्रमाण 319 इतके आहे.
संवादाचा अभाव व एकाकी वृत्ती
मुंबईसारख्या महानगरात वाढता वैयक्तिक तणाव, संवादाचा अभाव आणि एकाकी वृत्ती हे घटक आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळण्याची मानसिकता वाढत असल्याचे दिसते.