मुंबई : मुंबईतील नदी व नैसर्गिक तलावांमध्ये सोडण्यात येत असलेले सांडपाणी रोखण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार कामे सुरू करण्यात आली आहेत. नदी, तलावांना पूर्वीचे वैभव मिळणार आहे.
पवई येथून उगम पावणार्या मिठी नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतंत्रपणे विकास सुरू आहे. परंतु मुंबईतील दहिसर, पोईसर, ओशिवरा या नद्या व अन्य नैसर्गिक तलाव प्रदूषण मुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला होता. यानुसार ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
यासाठी स्वतंत्र मलनिःसारण वाहिनी टाकण्यात येत आहे. या वाहिनीमध्ये तलाव व नदीच्या आजूबाजूला राहणार्या वसाहतीतील सांडपाणी सोडले जाणार आहे. हे सांडपाणी रोखल्यानंतर नदी व तलाव स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेऊन, किनार्यावरील अनधिकृत बांधकाम हटवली जाणार आहेत. संरक्षण भिंतीसह टेहळणी करण्यासाठी सर्विस रोडही बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या पाण्यावर प्रक्रिया करून, ते समुद्र व नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे. ही कामे येत्या पाच वर्षात पूर्ण होणार आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण सुरक्षा समिती आणि अन्य विरुद्ध 28 ऑगस्ट 2019 मध्ये दिलेल्या आदेशांनुसार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या अन्य संबंधित खात्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणार्या सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करून ते समुद्र अथवा नाल्यात सोडले जाते का, याची खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मिठी नदीनंतर आता पश्चिम उपनगरातील दहिसर, पोयसर व ओशिवरा या नद्यांच्या किनार्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यात नद्यांचे रुंदीकरण व पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात येणार आहे. त्यामुळे या नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात आला.