मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला विकासकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेकडून 26 योजनांसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वारस्य दाखवलेल्या विकसकांसोबत पालिकेची पूर्व बोली सभा होईल. विकासकांना 30 सप्टेंबरपर्यंत आपली बोली सादर करता येणार आहे. या प्रकल्पात अधिक प्रीमियम देणार्या विकसकांना प्राधान्य असेल हे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या 64 भूखंडांवर एकूण 51 हजार 582 झोपड्या असून त्यापैकी 17 योजनांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 47 योजनांसाठी निविदा मागवल्या असता 86 विकासकांनी स्वारस्य दाखवले. यातील 21 योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र 8 योजनांना एकच तर 18 योजनांना एकही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या 26 योजनांसाठी पुन्हा स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) मागवण्यात आली आहे. विकासकांना 30 सप्टेंबरपर्यंत आपली बोली सादर करण्याची मुदत असून, अधिक प्रिमिअम देणार्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पात अदानी रियॅलिटी, वाधवा ग्रुप, दोस्ती, चांडक, रुस्तमजी, जेएसडब्ल्यू रियल्टी, डीएचएस ग्रुप, जलाराम डेवलपर्स, निलयोग डेवलपर्स, आशा डेव्हलपर्स आदी कंपन्यांनी पूर्वी स्वारस्य दाखवले होते.
अद्याप अंतिम यादी बाकी
विकासकांचा 47 योजनापैकी 21 योजनांना प्रतिसाद मिळाला आहे. मात्र वित्तीय छाननी अद्याप बाकी आहे. ही छाननी झालयानंतर सर्वाधिक अधिमूल्य देणार्या (प्रिमीयम) विकासकांची अंतिम यादी तयार केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.