मुंबई : रखडलेल्या शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात आढवा बैठक घेण्यात आली. उर्वरित कामांसाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून एक टाईमलाईन देण्यात आली आहे. हे काम मे 2026 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शीव पुलाच्या रेल्वेहद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे उपस्थित होते.
कामांसाठी अशी दिली मुदत
डिसेंबर 2025 : लालबहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा.
फेब्रुवारी 2026 : धारावी बाजूकडील दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम
मार्च 2026 : रेल्वे पुलावरील उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर तुळया बसविण्यात येणार
एप्रिल 2026 : पहिल्या आठवड्यात रेल्वे पुलाच्या दक्षिण बाजूवर तुळया बसविण्यात येणार.
एप्रिल 2026 : पूर्वी धारावी आणि लालबहादूर शास्त्री मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे होणार.
एप्रिल 2026 : नंतर पूर्व बाजूच्या पोहोच रस्त्याची कामे सुरू होणार.
मे 2026 : पर्यंत पूल पूर्णत: तयार होईल.
1 जून 2026 : पासून पूल वाहतुकीस खुला.