Crime News
मुंबई : मुंबईतील एका मूकबधिर महिलेने केलेल्या तक्रारीने १६ वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपीचा पर्दाफाश केला आहे. आरोपीने आपल्या जाळ्यात ओढून एक-दोन नव्हे, तर तब्बल २४ महिलांचे अनेक वर्षांपर्यंत लैंगिक शोषण केले. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून, त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू देखील लुटल्या. पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील विरारमधून आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिलेच्या एका मैत्रिणीने आरोपीच्या कृत्यांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेने निराश झालेल्या पीडितेने मौन सोडले. तिने तिच्या मित्र आणि सहकाऱ्यांसह सांकेतिक भाषेचा वापर करून एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉलद्वारे २००९ मध्ये, जेव्हा ती अल्पवयीन होती, तेव्हा आरोपीने तिला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.
पीडितेने सांगितले की, जेव्हा तिच्यासोबत पहिल्यांदा हा प्रकार घडला, तेव्हा ती अल्पवयीन होती. ती मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहत होती. तिची एक मैत्रीण तिला मुंबई फिरवण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेली होती. त्यावेळी तिने आरोपी महेश पवार याच्या सांताक्रूझमधील वाकोला येथील घरी तिला नेले. तिथे वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली आरोपीने तिला समोसे आणि ड्रग्ज मिसळलेले कोल्ड्रिंक दिले. काही वेळानंतर तिची मैत्रीण तिला आरोपीसोबत एकटीला सोडून तिथून निघून गेली. त्यानंतर आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले.
तिच्यासोबत केलेल्या या कृत्याचे आरोपीने चित्रीकरण केले. याच व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला अनेक वर्षांपर्यंत ब्लॅकमेल करत राहिला. मानसिक धक्का इतका मोठा होता की ती हे दुःख एकटीच सहन करत राहिली. त्यानंतर तो प्रत्येक वेळी तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवायचा.
भीती, लाज आणि सामाजिक दबावामुळे गप्प राहिल्याचे पीडितेने सांगितले. मात्र, मैत्रिणीचे दुःख तिला सहन झाले नाही आणि तिने सर्वांसमोर सत्य सांगितले. पीडितेने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर 'ठाणे डेफ असोसिएशन'चे अध्यक्ष वैभव घैसिस, सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद फरहान खान, साइन लँग्वेज इंटरप्रेटर मधु केनी आणि 'अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसेबिलिटीज'चे एक निवृत्त अधिकारी यांच्या मदतीने ती पोलिसांपर्यंत पोहोचली. कुरार पोलीस ठाण्यात इंटरप्रेटरच्या मदतीने कॅमेऱ्यासमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. जबाब नोंदवल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी महेश पवार याला पालघर जिल्ह्यातील विरार येथून अटक केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने अशाच प्रकारे अनेक मूक-बधिर महिलांना लक्ष्य केले होते. त्यांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे शोषण करण्यात आले आणि अश्लील व्हिडिओद्वारे गप्प राहण्याची धमकी देण्यात आली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये महिलांकडून पैसे, सोने आणि मोबाईल फोन देखील उकळण्यात आले आहेत. आतापर्यंत सात महिलांच्या शोषणाचे ठोस पुरावे मिळाले आहेत, मात्र पीडितांची संख्या २४ पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.