पोलीस दलात ऐन दिवाळीत उलथापालथ 
मुंबई

Police Officers Transfer : पोलीस दलात ऐन दिवाळीत उलथापालथ

पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या होणार बदल्या

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई : राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी गृहविभागाने पूर्ण केली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकार्‍यांच्या अंतिम यादीवर गृहविभागाने शेवटचा हात फिरवल्याची चर्चा आज गुरुवारी पोलीस दलात सुरू होती.

या बदल्यांमध्ये मुंबई आयुक्तालय, एसीबी मुख्यालय, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, सायबर सेल, सुरक्षा विभाग, फोर्सवन, मिरा भाईंदरसह ठाणे पोलीस आयुक्तांसह इतर विभागातीलही ( अ‍ॅडीशनल डीजी) दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अधिकार्‍यांसह पोलीस उपायुक्त दर्जाच्या 58 ते 60 अधिकार्‍यांसह 90 बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

राज्य पोलीस दलात मे महिन्याच्या शेवटी आणि त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत गृहविभागाने पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या बदलीस पात्र असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र त्याच यादीतील सुमारे 58 ते 62 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक, एसीबीसह इतर विभागात किमान एक वर्षाहून अधिक अतिरिक्त कालावधी मिळाला आहे.

काही अधिकार्‍यांनी बदलीला स्थगिती मिळवली. दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर कुठल्याही क्षणी बदल्यांची ऑर्डर निघू शकते अशी चर्चा पोलीसदलात सुरू होती. काही अ‍ॅडशिनल डीजी यांनी पसंतीचे ठिकाण ही सुचवल्याचे समजते. तर बदलीस पात्र असलेल्या डीसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी सावध पाऊल टाकत राजकीय नेत्यांच्या भेटी घेत चाचपणी केली होती. काहींच्या भेटी झाल्या तर काहींच्या चेहर्‍यावर नाराजीचे सूर उमटले होते. येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने या बदल्यांना विशेष महत्व आहे. अ‍ॅडिशनल डीजी मिलिंद भारंबे, आशुतोष डुंबरे, निकित कौशिक, विश्वास नांगरे पाटील, मधुकर पांडे, यशस्वी यादव, कृष्ण प्रकाश, विनयकुमार चौबे, अनुप कुमार या अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT