मुंबई : तुमच्या सीमकार्डचा वापर करून २३८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे भासवून, सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस दाखवत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी १२ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणाचा छडा लावत उत्तर विभाग सायबर पोलिसांनी इंडसइंड बँकेच्या ऑपरेशनल मॅनेजरसह वेब डेव्हलपर आणि अन्य चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन लॅपटॉप, २० मोबाईल फोन तसेच विविध व्यक्तींच्या बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
दहिसर येथील ६८ वर्षीय नागरिकाशी ३० जुलै ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत व्हॉट्सअॲपवरून व्हिडिओ कॉल करण्यात आले. दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे भासवून आरोपींनी त्यांच्या सीमकार्डचा वापर करून दिल्ली येथे २३८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून अटकेची भीती दाखविण्यात आली.
आरोपींनी पोलिस अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी गणवेशाचा वापर केला. तसेच शासकीय प्राधिकरणे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या नावाचे शिक्के, लेटरहेड आदींचा वापर करून पीडिताचा विश्वास संपादन केला. ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून पीडिताकडून १ कोटी १२ लाख २६ हजार रुपये विविध खात्यांमध्ये वळते करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
बँक खाते, मोबाईलची साखळी
अटक आरोपी राजेशकुमार मोहनलाल जैन (५४) हा ‘अभय देव गोल्ड प्रा. लि.’ कंपनीचा संचालक असून, या कंपनीचे इंडसइंड बँकेत खाते असल्याचे तपासात समोर आले. मोहम्मद तारिक अन्वर मोमीन (४९) याने दोन नवीन मोबाईल खरेदी करून संबंधित बँक खात्यांशी जोडलेली सीमकार्डे त्यात टाकली. हे मोबाईल इंडसइंड बँकेचा ऑपरेशनल मॅनेजर शिखर मुकेश त्यागी (२८) याच्याकडे देण्यात आले.
यानंतर संबंधित मोबाईल आणि सीमकार्डांची साखळी गौरव महेश गोयल (४०), अजयकुमार कालीप्रसाद शर्मा (३५) आणि चिंतनकुमार सुरेशभाई देसाई (४६) यांच्यापर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील गौरव गोयल हा वेब डेव्हलपर असून, त्याच्याविरुद्ध बांद्रा पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे तपासात आढळले. चिंतनकुमार देसाई याने मुंबईहून विमानाने दिल्ली गाठली. त्यानंतर बिजनौर, उत्तर प्रदेश येथे जाऊन सहकाऱ्यांच्या मदतीने पीडिताच्या खात्यातील रक्कम संबंधित खात्यांमध्ये वर्ग करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दोन लॅपटॉप, २० मोबाईल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप, २० मोबाईल फोन, २५ वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे, एटीएम कार्ड, पासबुक आणि आधारकार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहायक पोलीस आयुक्त सुवर्णा शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस हवालदार रवी पाटील आणि पोलीस शिपाई अक्षय साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सहा आरोपींची भूमिका
राजेशकुमार मोहनलाल जैन (५४) : बँक खातेधारक
मोहम्मद तारिक अन्वर मोमीन (४९) :विविध व्यक्तींची बँक खाती मिळवून पुढे उपलब्ध करून देणे
शिखर मुकेश त्यागी (२८): इंडसइंड बँकेचा ऑपरेशनल मॅनेजर असून, आरोपींना मदत केली
गौरव महेश गोयल (४०) :वेब डेव्हलपर असून परदेशातील सूत्रधारापर्यंत संपर्क आणि या गुन्ह्यातील महत्वाची तांत्रिक बाबीसाठी मोठी भूमिका
अजयकुमार कालीप्रसाद शर्मा (३५) :मोबाईलद्वारे पुढील प्रवेश उपलब्ध करून देणे
चिंतनकुमार सुरेशभाई देसाई (४६) :बिजनौर येथे जाऊन रकमेची विल्हेवाट लावणे