नवी मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प नियुक्त होताच डॉलरचा दर घसरला आणि रुपया वधारताच मुंबई सराफा बाजारात सोन्याचा दर तोळ्यामागे ६ हजार रुपयांनी घसरला. बुधवारी ६ नोव्हेंबरला ८५ हजार रुपये तोळे सोने होते. गुरुवारी ७ नोव्हेंबरला हाच दर ७९ हजार रुपयांवर आला. चांदीचेही दर किलोमागे ५ हजार रुपयांनी कमी झाले, अशी माहिती इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला दिली.
दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन दिवशी सोने ८१ हजार ७०० रुपयांवर पोहोचले होते. जीएसटी आणि घडणावळ धरुन सोने ९० हजार १५१ रुपये तोळे तर चांदी १ लाख ५ हजार रुपये किलोपर्यंत गेले होते. त्यापाठोपाठ घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींनी मात्र हे दर धाडकन आता खाली आले. दिल्लीच्या वृत्तानुसार, सोन्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. दिवाळीत प्रथमच २२० टन सोन्याची विक्री झाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव एक लाखांवर गेला होता. मात्र, ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत चांदीचा दर प्रतिकिलो ७ हजार रुपयांनी घटून ९३ हजार रुपयांवर आला आहे. याच कालावधीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅममागे २,७७० रुपयांनी घट झाली आहे. गुरुवारी (दि.७) शुद्ध सोन्याचा भाव ७८,५६० रुपयांवर आला.