मुंबई: मुंबईतील सर्व रस्त्यांची कामे 31 मेपर्यंत पूर्णत्वास नेण्यात यावीत. रस्त्यांची कामे करताना केवळ तुकड्यांमध्ये नव्हे, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा.
ज्या ठिकाणी या हंगामात काँक्रिट रस्त्यांची कामे होणे शक्य नाही, त्या ठिकाणी काँक्रिट रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले.
पुढे बोलताना भिडे म्हणाल्या, हे रस्ते वाहतुकीस सुरक्षित, सुयोग्य आणि एकसमान पातळीचे असावेत; कुठेही उंचसखलपणा राहू नये. आवश्यकतेनुसार मिलिंगची कामे करून रस्त्यांची पातळी संतुलित ठेवावी. रस्ते विकास कामांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात यावी.
शाळा, रुग्णालये आणि संवेदनशील ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेले गतिरोधक पुन्हा स्थापित करण्यात यावेत. तसेच, वाहतूक सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी थर्मोप्लास्टिक मार्किंग, रंबलर स्ट्रिप्स आदी आधुनिक पर्यायांचाही आवश्यकतेनुसार वापर करण्यात यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिले.
मॅनहोल उघडे राहणार नाहीत, याची दक्षता घ्या!
पावसाचे पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, पाणी उपसा यंत्रणा, पंप तसेच अन्य आपत्कालीन उपकरणांच्या सुसज्जतेचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. सखल भागांमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा.
तसेच, कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) उघड्या राहणार नाहीत, याची अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशही भिडे यांनी दिले.