मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आजही तब्बल 90 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही मुबलक पाणीसाठा असल्यामुळे यंदा मुंबईकरांची पाणीटंचाईतून सुटका होणार आहे.
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावांतील पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात असलेली पाणीटंचाईची भीती संपलेली आहे. 2024 मध्ये 25 नोव्हेंबरपर्यंत 86 टक्के, तर 2023 मध्ये 82 टक्के पाणीसाठा होता.
यंदा हाच पाणीसाठा 90.25 टक्के इतका आहे. म्हणजे तलावांत 13 लाख 6 हजार 187 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. शहराला दररोज 1,850 दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही 6 लाख 46 हजार दशलक्ष लिटर, तर 450 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा तलावातही 99 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तलावांतील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)
अप्पर वैतरणा - 99.5%
मोडक सागर -61.1%
तानसा - 89.07%
मध्य वैतरणा- 99.9%
भातसा - 90.1%
विहार - 92.7%
तुळशी - 85.8%