मुंबई : राज्यातील मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. यावर्षी २१ डिसेंबरपर्यंत मुंबईत मलेरियाचे ७ हजार ८०६, तर डेंग्यूचे ५ हजार ८५२ रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून ७३५ रुग्ण सापडले आहेत, तर मलेरिया आणि डेंग्यूचे प्रत्येकी पाच बळी गेले आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून साथीच्या आजाराने डोके वर काढले होते. सप्टेंबर महिन्यात यावर्षीचे सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये मलेरियाचे १२६१ आणि डेंग्यूचे १४५६ आढळून होते. ऑक्टोबर महिन्यापासून पालिकेने साथीच्या आजारांची आकडेवारीच दिलेली नाही. मलेरियाचे रुग्ण सामान्यतः पावसाळ्याच्या म्हणजेच जुलै ते ऑक्टोवर आणि डेंग्यूचे रुग्ण सामान्यतः ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांत वाढतात. मुख्य कारण म्हणजे तापमान, आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा पाऊस यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे वेक्टर डासांची पैदास होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यापर्यंत डेंग्यूचे २१ बळी गेल्याचे सांगितले आहे, पण राज्याच्या आकडेवारीनुसार मुंबईत डेंग्यूचे डिसेंबरपर्यंत पाचच बळी गेल्याची नोंद झाली आहे.
राज्यात डिसेंबरपर्यंत मलेरियाचे १५ हजार ६७० रुग्ण, तर डेंग्यूचे १९ हजार १३० रुग्ण आढळले आहेत. मलेरियाने १३ रुग्णांचा, तर डेंग्यूने २६ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात मलेरियाचे जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये ६ हजार ५७६ हे सर्वाधिक रुग्ण असून त्यानंतर रायगडमध्ये ५४२, चंद्रपूर ५३० रुग्ण आढळले आहेत. महापालिकांमध्ये मुंबईनंतर पनवेलमध्ये ९७३, ठाण्यामध्ये ७१५ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोल्हापुरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असून ७४७ रुग्ण आहेत. त्यानंतर पालघरमध्ये ५६५, साताऱ्यामध्ये ५४२ रुग्ण आहेत. महापालिकेच्या मुंबईनंतर डेंग्यूचे नाशिकमध्ये १ हजार १९५, तर कोल्हापुरामध्ये ४९८ रुग्ण आढळले आहेत.