आतापर्यंत मुंबईत अवघा 35% पाऊस  pudhari photo
मुंबई

Mumbai rainfall : आतापर्यंत मुंबईत अवघा 35% पाऊस

गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के कमी पाऊस, जोरदार पावसाची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात मे महिन्यात पाऊस दाखल होऊनही आतापर्यंत म्हणजेच 17 जुलैपर्यंत शहरात अवघा 35 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 22 टक्के पाऊस यंदा कमी आहे. गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत सरासरी 57 टक्के पाऊस झाला होता.

मुंबईत मे महिन्यातच पावसाचे धूमधडाक्यात आगमन झाले. जूनमध्येही जोरदार पाऊस झाला. मात्र जुलैमध्ये पावसाचा जोर ओसरला. 17 जुलैपर्यंत शहर विभागात 34.98 टक्के तर उपनगरात 34.31 टक्के पाऊस झाला.

2024 मध्ये 17 जुलैपर्यंत शहरात 57.38 टक्के तर उपनगरात 54.51 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईत येणार्‍या दोन महिन्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस व ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहरापेक्षा उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक असते.

जूनमध्ये मोठा पाऊस झाल्याचे काही अपवाद वगळता जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात शहरातील एकूण सरासरी पावसाच्या साधारणतः 60 टक्के पेक्षा जास्त पाऊस होतो. 2007 मध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात 47 टक्के पाऊस पडला होता. तर 2004 मध्ये या दोन महिन्यात 78 टक्के पाऊस झाला होता.

मुंबई महानगरपालिकेने शहराच्या विविध भागात लावलेल्या पर्जन्यजलमापक मोजणीच्या आधारे संपूर्ण शहरात आतापर्यंत 32.50 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात 30 टक्के शहरात तर 32 टक्के उपनगरात पाऊस झाला आहे. मुंबई शहरात वार्षिक सरासरी 2095 मिमी तर उपनगरात 2,319 मिमी पाऊस होतो. परंतु आतापर्यंत शहरात 732 मिमी तर उपनगरात 795 मिमी पाऊस झाला आहे.

तुळशी विहार तलावातील पाणीपातळीत हळुवार वाढ

शहरात जोरदार पाऊस नसल्यामुळे नॅशनल पार्कमधील शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तुळशी व विहार तलावातील पाणी पातळीतही हळुवार वाढ होत आहे. ही तलाव अन्य तलावांच्या तुलनेत लहान असल्यामुळे जुलै पहिल्या आठवड्यात ओसंडून वाहणे अपेक्षित असते. मात्र सध्या या तलावात 52 ते 53 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT