मुंबई : चार वर्षांपासून मुंबई विभागाच्या बारावीच्या निकालात होत असलेल्या घसरगुंडीला यंदा ब्रेक लागला असून, या वेळेच्या परीक्षेत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांना निकाल उंचावला आहे. राज्यात मुंबई विभागाने पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई विभागाचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत 0.93 टक्क्यांनी वाढला असून, यंदा 92.93 टक्के निकाल लागला आहे.
रायगड जिल्ह्याने गतवर्षीप्रमाणे मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. रायगडचा निकाल 94.66 टक्के इतका लागला आहे, तर गतवर्षीप्रमाणेच दक्षिण मुंबईचा निकाल सर्वात कमी 90.67 टक्के इतका लागला आहे. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारल्याचे चित्र आहे.
राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई मंडळाने बारावीच्या निकालात यंदा चांगली कामगिरी केली आहे. 92.83 टक्के उत्तीर्णतेसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. हा निकाल गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईच्या निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत तळाशी असलेले मुंबई विभागीय मंडळ यंदा पहिल्या तीन मध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबई विभागात यंदा 3 लाख 15 हजार 118 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 3 लाख 14 हजार 144 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 2 लाख 91 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 1 लाख 60 हजार 969 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 47 हजार 452 उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 91.60 टक्के इतके आहे, तर मुली 1 लाख 53 हजार 175 बसल्या होत्या, त्यापैकी 1 लाख 44 हजार 503 उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्णता 94.33 टक्के इतकी आहे. एकूणच निकालात मुलींनी धमाका करताना दिसल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींनी तब्बल 2.73 टक्क्यांनी अधिक बाजी मारली आहे.
मुंबई विभागातून लागलेल्या या निकालामध्ये यंदाही रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील 29 हजार 493 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 848 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या जिल्ह्याचा निकाल 94.66 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल ठाण्याचा निकाल 93.74 टक्के लागला असून, ठाण्यातून 96 हजार 89 विद्यार्थ्यांपैकी 89 हजार 827 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई पश्चिम उपनगरने 93.18 टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. पश्चिम उपनगरातील 64 हजार 866 विद्यार्थ्यांपैकी 60 हजार 297 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई पूर्व उपनगरमधील 37 हजार 346 विद्यार्थ्यांपैकी 34 हजार 318 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने हा जिल्हा 92.27 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यातील 50 हजार 870 विद्यार्थ्यांपैकी 46 हजार 729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघरचा निकाल 92.19 टक्के इतका लागला आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास मुंबई शहराचा सर्वात कमी 90.67 टक्के इतका निकाल लागला आहे. येथून 36 हजार 454 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील 32 हजार 936 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक असून 96.33 टक्के लागला आहे. मुंबई विभागात या शाखेतून 1 लाख 17 हजार 932 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 1 लाख 13 हजार 410 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल 92.59 टक्के लागला आहे. या शाखेतून 1 लाख 53 हजार 354 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 1 लाख 41 हजार 537 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी 2 हजार 904 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 2 हजार 628 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण 91.34 टक्के इतके आहे. त्याखालोखाल कला शाखेतील 40 हजार 71 विद्यार्थ्यांमधून 33 हजार 713 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 84.63 टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल आयटीआय शाखेचा 78.28 टक्के इतका लागला आहे. आयटीआय शाखेतून 857 विद्यार्थांपैकी 667 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.