Mumbai Rani Baug Zoo Pudhari
मुंबई

Rani Baug Zoo Lions: राणीबागेत १२ वर्षांनंतर पुन्हा सिंहाचे दर्शन; जानेवारीत गुजरातमधून सिंहांच्या जोड्या येणार

येत्या महिनाभरात प्राणी देवाण-घेवाणाची कागदोपत्री प्रक्रिया पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषानुसार सकरबाग प्राणी संग्रहालयातून सिंहाच्या जोड्या राणीबागेत आणणे व तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे सकरबागला देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये मुंबईकरांना तब्बल १२ वर्षानंतर सिंहाचे दर्शन होणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय (राणीबाग) येथील जिमी सिंहीणीचा २०१४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर तब्बल बारा वर्ष मुंबईकरांना सिंहाचे दर्शन झालेले नाही. मात्र महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची भेट घेऊन या प्रक्रियेला वेग देण्याची मागणी केली होती.

त्यामुळे आता राणीबागेत सिंह आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ३८ नुसार गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध सकरबाग प्राणिसंग्रहालय व राणीबाग प्राणीसंग्रहालय यांच्यात प्राण्यांच्या देवाण-घेवाणाबाबत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून ग्रीन सिग्नल मिळाले आहे.

त्यानुसार अन्य प्रक्रिया पार पाडून दोन जोड्या आशियाई सिंह राणीबागेत आणण्यात येणार आहेत. या बदल्यात राणी बागेतून तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे सकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे.

प्राणी देवाण-घेवाणाची प्रक्रिया कागदोपत्री पार पडल्यानंतर प्रत्यक्ष प्राण्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये सिंहाच्या जोडी राणीबागेत आणल्या जाणार आहेत.

या जोड्या आणण्यापूर्वी राणी बागेतील तज्ञ डॉक्टरांसह अन्य कर्मचारी सकरबाग येथे सिंहाचे पालन पोषण कसे करावे, कोणत्या सवयी आहेत, याबाबत अभ्यास करणार आहेत. त्यानंतर सिंहाला मुंबईत आणतेवेळी सकरबागमधील कर्मचारीही काही दिवस राणीबागेमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान

नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय यांच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार (मास्टर लेआऊट प्लॅन) राणीबाग प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान सज्ज करण्यात आले आहे.

हा पिंजरा गुजरातमधील गीर अभयारण्य पट्टयात राहणाऱ्या नागरिकांच्या मलदाई झोपडीच्या प्रतिकृती सारखा आहे. सिंहाला आराम करण्यासाठी जंगलाचा भास निर्माण करणारी मोकळी जागा, गुहा व बसण्यासाठी मचान तयार करण्यात आले आहे. सिंहाला जेवणासाठी विशेष जागा बनवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT