मुंबई: हवामान खात्याने (IMD) दिलेला 'रेड अलर्ट' खरा ठरवत मंगळवारी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सोमवारपेक्षाही अधिक बिकट परिस्थिती निर्माण होऊन मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. ३६ तासात ४०९ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागातील सुमारे ४०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, ११ विमानांना दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आले. दरम्यान, भांडुपमध्ये विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मंगळवारी ठप्प झालेली लोकल आज सुरळीत सुरू आहे. गाड्यांना मात्र उशिर होत असून यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. काल संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोरेल बंद पडली होती. वीज पुरवठा खंडित होऊन मोनोरेल दोन स्थानकांच्या दरम्यान बंद पडली आणि प्रवासी एक तास अडकून पडले. एसी बंद असल्याने अनेकजण गुदमरले. श्वास घेता यावा म्हणून काहींनी मोनोच्या खिडक्या तोडल्या शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्नोर्केल वाहनाद्वारे प्रवाशांची सुटका केली होती. यानंतर ठप्पा झालेली मोनो रेल्वेची सुविधा आज सुरू झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रवाशांसाठी सुजना जारी केल्या आहेत. " मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे हवाई वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, त्यामुळे विमानसेवा प्रभावित होऊ शकते. आम्ही कार्य सुरळीत ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असलो तरी, आपण आधीच नियोजन करणे शिफारसीय आहे. आपल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती आपल्या नोंदणीकृत संपर्कावर दिली जाईल. त्यामुळे आपली संपर्क माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्या. विमानतळावर निघण्यापूर्वी वेबसाइट किंवा अॅपवर आपली flight status तपासून घ्या. तसेच, पाणी साचणे आणि संथ गतीने वाहणारी वाहतूक लक्षात घेता, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ ठेवा." अशा सुचना इंडिगोने दिल्या आहेत.
मुंबईत गेल्या पाच वर्षांत ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक भागांमध्ये २४ तासांत ३०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर मालाडच्या चिंचोली येथे सर्वाधिक ३६१ मिमी पाऊस पडला. १५ ऑगस्ट सकाळी ८.३० ते मंगळवारी रात्री ८.३० या पाच दिवसांच्या कालावधीत मुंबईत एकूण ८३७.३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. आजही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्याने मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.