Mumbai Rains
मुंबई शहर आणि उपनगरांतील पावसाचा यलो अलर्ट कायम असून ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. File Photo
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईला यलो तर ठाण्यात ऑरेंज अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई | Mumbai Rain Update : मुंबई शहर आणि उपनगरांतील पावसाचा यलो अलर्ट कायम असून ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) फोरकास्टचा आढावा घेतल्यास मुंबईत गेले तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. आज यलो अलर्ट असल्याने तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तशीच स्थिती राहणार असून वीकेंडला ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे आठवडा अखेर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट असल्याने काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, यलो अलर्टमुळे उद्या पुन्हा तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. रायगडसह कोकणात मोठ्या सरी पडण्याचा सिलसिला कायम राहील, असे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे.

सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेने आज मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र, पावसाने ब्रेक घेतल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी सांताक्रुझ वेधशाळेत किमान 25 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मंगळवारच्या तुलनेत कमाल तापमान 6 अंशांनी वाढले. गुरुवारी कमाल तापमानात (30 अंश सेल्सिअस) थोडी घट आहे. मात्र, पुढील दोन दिवस कमाल तापमान पुन्हा तिशीमध्ये राहण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT