Mumbai Pune expressway traffic jam | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा कोंडी 
मुंबई

Mumbai Pune expressway traffic jam | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा कोंडी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई; पुढारी डेस्क : प्रॉपेलीन या धोकादायक वायूची वाहतूक करणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी झालेल्या 32 तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर शनिवारी रात्रीही मुंबईकडे येणारा मार्ग लोणावळा घाटाजवळ दोन तासांसाठी ठप्प झाला आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले. एरवी तीन तासांत पार होणारे हे अंतर कापण्यास वाहन चालकांना साडेपाच ते सहा तास लागले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या. त्यासाठी मुंबईतून शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात मतदार पश्चिम महाराष्ट्रात मतदानासाठी गेले होते. मतदान आटोपल्यानंतर शनिवारी रात्री हीच वाहने मुंबईत परतली. त्याचबरोबर सुट्टीचा दिवस असल्यामुळे या मार्गावर नेहमीपेक्षा जास्त वाहने धावत होती. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली. तसेच काही ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असल्याने ती थांबवून ठेवण्यात आली होती, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले होते. त्याचा परिणाम काही ठिकाणी वाहतूक ठप्प होण्यामध्ये झाला. काही ट्रक आणि कंटेनर आपली दिशा सोडून मधल्या मार्गिकेने धावत असल्यामुळे इतर वाहनांना त्यांचा अडथळा जाणवत होता. या कारणामुळेही वाहतूक कोंडीत भर पडली होती, असे अनेक कार चालकांनी सांगितले.

पुण्याकडे जाणारी वाहतूक बर्‍याच अंशी सुरळीत होती. मात्र दुसर्‍या बाजूला मुंबईकडे येणारी वाहने अत्यंत संथगतीने पुढे सरकत होती. लोणावळा घाटामध्ये तर कोंडी होऊन वाहने जागीच थबकली होती. यामध्ये बहुतांशी खासगी बसेस आणि टेम्पोचा समावेश होता. एका ट्रॅव्हल कंपनीने 25 कार्स मुंबईकडे रवाना केल्या होत्या. या सर्व कार वाहतूक कोंडीत अडकल्या. एरवी दोन ते अडीच तासांत पनवेल गाठणार्‍या या कार्सना तब्बल पाच तास लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT