छोटीशी ठिणगी अनर्थ घडवण्यास पुरेशी होती pudhari photo
मुंबई

Mumbai Pune Expressway tanker accident : छोटीशी ठिणगी अनर्थ घडवण्यास पुरेशी होती

प्रॉपेलिन हा अतिज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तब्बल 32 तास ठप्प

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रॉपेलिन हा अतिज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तब्बल 32 तास ठप्प झाला होता. उलटलेल्या टँकरमधून सुरू झालेली वायू गळती थांबवण्यासाठी 22 तास अथक परिश्रम करावे लागले. यादरम्यान, एखादी छोटीशी आगीची ठिणगी पडली असती तर, अनर्थ घडून प्रचंड मोठा हाहाकार उडाला असता.

मंगळवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान आडोशी बोगद्याजवळ हा 21 हजार किलोचा वायू वाहून नेणारा टँकर उलटला. त्यातून 3 ठिकाणांहून वायू गळती सुरू झाली. ती थांबवण्यासाठी ठाण्यातील मेकॅनिकल इलेक्ट्रिक इंडस्ट्रिज सर्व्हिस या कंपनीने महत्वाची भूमिका बजावली.

या कंपनीचे तांत्रिक संचालक झेड. एन. गावडे या संदर्भात माहिती देताना म्हणाले, हा मोठा बाका प्रसंग होता. कोणत्याही क्षणी आगीचा भडका उडून त्या परिसराला मोठा फटका बसला असता. या टँकरला असलेले तिन्ही व्हॉल्व पूर्णत: खराब झाले आणि तेथून वायू गळती सुरू झाली. या तिन्ही भागांतून झपाट्याने प्रॉपेलिन हवेत पसरू लागला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुरू असलेली वाहतूक थांबवण्यात आली. या ठिकाणी आग लागून स्फोट झाला असता तर, आजूबाजूच्या 500 मीटरच्या परिघाच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला असता, असे गावडे म्हणाले.

आमचे पथक एका रुग्णवाहिकेमधून पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी पोहचले. त्यानंतर ही वायू गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जीव धोक्यात टाकून हे काम केले गेले. सुरुवातीला तीन पैकी दोन ठिकाणची वायू गळती थांबवण्यात आली. तिसऱ्या ठिकाणची गळती थांबवणे खरे आव्हान होते. कारण या व्हॉल्वला असणारे हॅन्डल जाम झाले होते. त्यामुळे ते सहजासहजी फिरत न्हवते त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडत होता.

परिस्थितीचा अंदाज घेऊन या टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्घटनाग्रस्त टँकरमधील द्रव रुपात असलेले रसायन एका विशिष्ट पातळीवर आणेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. बुधवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान एका खास रबरी नळीच्या सहाय्याने हे रसायन दुसऱ्या टँकरमध्ये काढण्यात आले. हे करताना अत्यंत काळजी घेण्यात आली. काही वेळानंतर 50% रसायन दुसऱ्या टँकरमध्ये काढले गेले. त्यानंतर आडवा झालेला दुर्घटनाग्रस्त टँकर उभा करण्यात आला. याकामी पोलिसांसह आपत्ती निवारण दल, अग्निशमन यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासनाने अक्षरश: रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम केले. असे गावडे यांनी सांगितले.

रात्री दीड वाजता हा टँकर दुर्घटनास्थळावरून हलवण्यात आला. या टँकरमधून अन्य टँकरमध्ये रसायन काढण्यात आले तरी अजूनही मूळ टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात हे रसायन शिल्लक होते. हा टँकर पहाटे 5 वाजता खालापूर येथील प्रकल्पामध्ये आणण्यात आला. अलिकडच्या काळातील महामार्गावरील गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची अत्यंत धोकादायक परिस्थितीत राबवलेली पहिलीच मोहिम असावी. अत्यंत एकाग्रतेने प्रचंड संयम बाळगत ही मोहिम यशस्वी करण्यात आल्याचे गावडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT