Mumbai Pune Expressway Closed File Photo
मुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून 1 मे पासून वेगवान प्रवास, अर्ध्या तासाने वाचणार प्रवासाचा वेळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‌‘ॲक्सेस कंट्रोल‌’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‌‘मिसिंग लिंक‌’ प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झाले. एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेगवान, सुरक्षित आणि ‌‘सिग्नल फ्री‌’ होणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी रविवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील, असे सांगत वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल. या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील, असा ठाम दावाही शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे, असे ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाŠयावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT