Mumbai Property Sales Pudhari
मुंबई

Mumbai Property Sales| मुंबईचा ‌‘मार्च‌’: 15 हजार मालमत्तांची विक्रमी विक्री

या वाढलेल्या व्यवहारांमुळे मुद्रांक शुल्कातून 1 हजार 492 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आर्थिक वर्षाची अखेर मुंबईच्या गृहविक्री क्षेत्रासाठी आश्वासक ठरली. मार्च 2026मध्ये एकूण 15 हजार 516 मालमत्तांची विक्री झाली. हे प्रमाण गेल्या 14 वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वाधिक आहे. या वाढलेल्या व्यवहारांमुळे मुद्रांक शुल्कातून 1 हजार 492 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला.

फेब्रुवारी 2026च्या तुलनेत मार्चमधील नोंदणी 19 टक्क्यांनी वाढली, तर मुद्रांक शुल्कात 32 टक्क्यांची वाढ झाली. वर्षनिहाय आधारावर नोंदणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले असून मुद्रांक शुल्कात मात्र वर्षनिहाय 6 टक्क्यांची किरकोळ घट झाली. येथे मागणी कमी होणे हे कारण नसून किमती स्थिर राहाणे हे कारण आहे. नाइट फ्रँक इंडिया यांच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

घर खरेदी करताना 1 ते 2 कोटी किमतींच्या गटाकडे होत असलेली सातत्यपूर्ण वाढ घर खरेदीदारांच्या अपेक्षांमधील उन्नती स्पष्टपणे दर्शवते, असे नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी सांगितले.

1 ते 2 कोटींच्या श्रेणीमध्ये मध्यम उत्पन्न गटाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ग्राहक गुणवत्तापूर्ण खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसते, असे द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायजरीचे सह-संस्थापक राम नाईक यांनी सांगितले.

विशेषतः 500 ते 1000 चौरस फूट गटातील घरांचे सातत्यपूर्ण वर्चस्व मुंबईतील मागणीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाला अधोरेखित करते, जिथे कार्यक्षमता आणि उपयुक्तता हे खरेदीचे प्रमुख घटक राहतात. त्याच वेळी, 500 चौरस फुटांखालील युनिट्समध्ये झालेली किरकोळ घट खरेदीदारांमधील जीवनशैलीतील उन्नती दर्शवते, असे सृष्टी ग्रुपचे सह-संस्थापक कमलेश ठाकूर यांनी सांगितले.

ग्राहकांचा कल काय ?

निवासी मालमत्तांचा बाजारात मोठा वाटा कायम राहिला असून एकूण नोंदणीपैकी सुमारे 80% हिस्सा निवासी व्यवहारांचा होता. 1 ते 2 कोटी रुपयांच्या किंमत गटातील मालमत्तांचा वाटा लक्षणीय वाढून 38 टक्के झाला, जो मागील वर्षी 32 टक्के होता. याउलट, 1 कोटी रुपयांखालील श्रेणीतील हिस्सा 46 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत घटला. 2 ते 5 कोटी आणि 5 कोटींपेक्षा जास्त किमतींच्या घरांचा वाटा अनुक्रमे 17 टक्के आणि 6 टक्के इतकाच राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT