मुंबई : नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत मॅनेजमेंट आणि एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बीटेक पदवीधर असलेल्या ३२ वर्षीय सोनू कुमारने नऊ बेरोजगार इंजिनिअर्सना सोबत घेऊन हे रॅकेट चालवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या टोळीने आतापर्यंत किमान ३५ विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून सुमारे ५० लाख रुपये उकळले. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट तसेच एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या जाहिराती केल्या. प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर विश्वास संपादन करून विविध कारणे सांगत त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, टोळीने आपली ओळख लपविण्यासाठी बर्नर फोन, सिमकार्ड आणि बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आरोपींचा खरा ठावठिकाणा शोधणे कठीण जात होते.
नऊ इंजिनिअर्सना सोबत घेतले
या रॅकेटचा कथित सूत्रधार सोनू कुमार हा पुण्यातील एमआयटी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून त्याने बीटेकचे शिक्षण घेतले आहे. २०२४ पासून तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी मिळत नसल्याने त्याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि प्रवेश प्रक्रियेची असलेली माहितीचा गैरवापर करून हे रॅकेट उभारल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने बिहार, हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील नऊ बेरोजगार इंजिनिअर्सना या रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले. कुमारने यापूर्वी रिअल इस्टेट व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात अपयश आल्याचे तपासात समोर आले.
पुण्यात थाटले कॉल सेंटर
प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या काळात टोळीतील आरोपी पुण्यात दाखल होत होते. विमाननगर परिसरातील तीन भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांनी आपले बनावट कॉल सेंटर थाटले होते. आरोपींच्या कुटुंबीयांना आपण चार महिन्यांच्या कंपनी प्रोजेक्टसाठी पुण्यात जात असल्याचे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे, प्रवेशाच्या प्रक्रियेबाबत माहिती देणे आणि पैसे मागणे, अशी कामे या ठिकाणाहून केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
किती विद्यार्थी जाळ्यात?
या टोळीने ३५ विद्यार्थ्यांकडून सुमारे ५० लाख रुपये उकळल्याचे सध्या समोर आले असले, तरी फसवणुकीची व्याप्ती यापेक्षा मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंट, फोन, सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून आणखी किती विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.