मुंबई : पश्चिम व पूर्व उपनगरांपेक्षा मुंबई शहर विभागाचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे येथे दाटीवाटीने मुंबईकर राहात आहेत. शहर भागाचे सरासरी 72.02चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यामुळे येथील सुमारे 32 लाख 27 हजार 276 लोकसंख्या गृहीत धरल्यास प्रतिचौरस किमी क्षेत्रफळात सुमारे 44 हजार 81 नागरिक राहात आहेत. त्या तुलनेत पश्चिम उपनगरात प्रतिचौरस किमी 24 हजार 85, तर उपनगरांत 22 हजार 43 नागरिक राहात आहेत.
मुंबई शहरापेक्षा पश्चिम व पूर्व उपनगराचे क्षेत्रफळ जास्त आहे. त्यामुळे साहजिकच येथील लोकसंख्याही जास्त आहे. पण क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे उपनगरांत नागरिकांना दाटीवाटीने राहण्याची गरज भासत नाही. संपूर्ण मुंबई शहराचे क्षेत्रफळ 483.14 चौरस किमी इतके आहे. यात शहर विभागापेक्षा तीन पट जास्त क्षेत्रफळ पश्चिम उपनगराचे आहे. शहर विभागात 72.02 चौरस किमी क्षेत्रफळ असून पश्चिम उपनगरात 232.55 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. पूर्व उपनगरातही शहरापेक्षा जास्त क्षेत्रफळ असून हे क्षेत्रफळ 178.57 चौरस किमी इतके आहे.
पश्चिम उपनगरांमधील लोकसंख्या मुंबई शहरापेक्षा सुमारे 2 कोटी 50 लाखपेक्षा जास्त असली तरी, येथे प्रति चौरस किलोमीटर 24 हजार 85 नागरिक राहतात. याचाच अर्थ शहरापेक्षा पश्चिम उपनगरात प्रतिचौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणार्या नागरिकांची संख्या सुमारे 20 हजाराने कमी आहे. पूर्व उपनगर तर राहण्यासाठी सुटसुटीत असून येथे प्रतिचौरस किमी क्षेत्रफळात अवघे 22 हजार 43 नागरिक राहतात. शहरसह पश्चिम व पूर्व उपनगराचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या लक्षात घेता, पश्चिम व पूर्व उपनगरांत लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी जागा असल्याचे स्पष्ट होते.