ठळक मुद्दे
तिकीट कापताच अनिल कोकीळ शिंदे सेनेकडून रिंगणात
प्रकाश पाटणकरही शिंदे गटाकडून उतरले प्रभाग १९२ मध्ये
स्नेहल सुधीर जाधव दाम्पत्याचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र
मुंबई : परळ-लालबागमध्ये शिवसेना फुटीनंतर निष्ठावंत राहिलेल्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांची उमेदवारी कापल्यामुळे सुरुवातीपासून राहिलेला ठाकरेंचा बालेकिल्ला दुभंगणार आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे ठाकरेंचे सोलापूर संपर्कप्रमुख माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर अक्षरशः गोंधळ घालत निषेध नोंदवला आणि पाठोपाठ शिंदे गटात प्रवेश करून कोकिळ यांनी प्रभाग २०४ ची उमेदवारीही मिळवली.
परळ, लालबाग, नायगाव, काळाचौकी हा सुरुवातीपासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना दुभंगल्यानंतरही या बालेकिल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. परंतु आता मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारीवरून या बालेकिल्लाला तडे जाऊ लागले आहेत.
माजी नगर-सेवक अनिल कोकिळ यांचे तिकीट कापले
प्रभाग क्रमांक २०४ मधून माजी नगर-सेवक अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारून मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रभागातून अनिल कोकीळ यांची उमेदवारी अखेरपर्यंत निश्चित होती. परंतु माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह येथील शाखाप्रमुख किरण तावडे यांनी कोकीळ यांना उमेदवारी देऊ नये, म्हणून आक्रमक पवित्रा घेतला. स्वतः उद्धव ठाकरे कोकीळ यांनाच उमेदवारी देण्यासाठी उत्सुक होते. परंतु शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना विश्वासात घेऊन ऐनवेळी कोकीळ यांची उमेदवारी कापण्यात आली व शाखाप्रमुख किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोकीळ समर्थकांनी थेट मातोश्रीवर जाऊन गोंधळ घातला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही.
वॉर्ड क्रमांक २०४ मधून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडेंना उमेदवारी जाहीर करताच अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अर्ध्या तासात प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांना लगेच एबी फॉर्म मिळाला. आता अनिल कोकीळ वॉर्ड क्रमांक २०४ मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील. मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. या दोघांत आता लढत होईल.
२०१७ च्या निवडणुकीत अनिल कोकीळ हे प्रथमच शिवसेनेतून निवडून गेले. बेस्ट उपक्रमातील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पालिका निवडणूक लढवली होती. बेस्ट कामगार सेनेचा कार्यकर्ता ते बेस्ट समितीचा अध्यक्ष अशी पदे त्यांना ठाकरे यांनी दिली होती. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागात ठाकरे सेनेला कमी मते मिळाली होती, त्यामळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती,
उद्धव सेनेवर सैनिकांचे आक्षेप
माजी महापौर श्रद्धा जाधव १९९२ पासून सलग नगरसेवक असल्यामुळे येथे अन्य पदाधिकाऱ्याला उमेदवारी देण्याची मागणी होती. मात्र श्रध्दा जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिली.
माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या कामावर शिवसैनिक व जनता नाराज आहे. अन्य उमेदवाराचा विचार मात्र केला नाही.
शिवसेनेत सक्रिय नसतानाही विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली.
विधानसभेला सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावूनही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करणाऱ्या अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारली.
भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा उमेदवारी दिली.
स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून कट्टर शिवसैनिक चंद्रशेखर वायंगणकर यांची उमेदवारी ऐनवेळी कापली.
प्रभाग २०२ मधून माजा महापौर श्रद्धा जाधव याचा मुलगा पवन जाधव इच्छुक होता. मात्र स्थानिक शाखाप्रमुखाचा विरोध असल्याने श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी देण्यात आली. या निर्णयावर शिवसैनिक अजूनच नाराज झाले असून एकच व्यक्तीला किती वेळा उमेदवारी देणार असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे. १९९२ पासून सलग श्रद्धा जाधव या नगरसेवक आहेत. अन्य कार्यकर्त्यांनाही नगरसेवक बनण्याची संधी द्या, अशी मागणीही मातोश्रीवर करण्यात आली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
प्रभाग क्रमांक २०३ मधून माजी आमदार दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ इच्छुक होती. पण त्यांच्याजागी भारती पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कट्टर शिवसैनिक सिंधू मसूरकर या देखील इथे दावेदार होत्या. संपूर्ण गिरणगावात ठाकरे सेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.
स्नेहल जाधव शिंदेसेनेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे स्नेहल व सुधीर जाधव या दाम्पत्याने मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग १९२ मध्ये मनसेचे क्रमांक एकचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांची निवडणूक अवघड करून ठेवली. स्नेहल जाधव यांनी यावेळी सांगितले की, शिवसेनेची सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, विकासाभिमुख धोरणे आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी शिवसेनेत मिळेल, असे त्या म्हणाल्या. सुधीर जाधव यांनीही पक्ष संघटनेत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.