Sanjay Raut Pudhari File Photo
मुंबई

Sanjay Raut : मुंबईतील युद्ध अजून संपलेले नाही : संजय राऊतांनी नेमका कोणता दावा केला?

'ईव्हीएम'मधील गोंधळामुळे बारा प्रभागांमध्ये अजूनही मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on BMC election results

मुंबई: "मुंबईतील राजकीय युद्ध अजून संपलेले नाही. अनेक ठिकाणी अद्याप मतमोजणी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अंतिम आकडा नक्कीच बदलेल," असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. मुंबईतील मतमोजणीत होत असलेल्या विलंबावर बोट ठेवत त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर निशाणा साधला.

अनेक प्रभागांत मतमोजणी रखडली

संजय राऊत म्हणाले की, मुंबईतील १२ हून अधिक प्रभागांमध्ये अजूनही मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली नाही. अनेक ठिकाणी ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये गोंधळ असल्याचे समोर येत आहे. "आमचे उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत. जोपर्यंत शेवटच्या फेरीची मतमोजणी होत नाही, तोपर्यंत निकाल स्पष्ट होणार नाही. मुंबईची लढाई अद्याप सुरूच आहे," असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात एक्स पोस्टमध्ये राऊतांनी म्हटलं आहे की, संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. ६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक आहे. यातील अनेक ठिकाणी अटीतटीची आहे. शिवसेना आणि मनसे टक्कर देत आहे. भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे! दुपारनंतर शिवसेना-मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत!

ठाणे सोडले तर शिंदेंचा पराभवच!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे सोडले तर उर्वरित ठिकाणी पराभवच झाला आहे. मुंबईत भाजपने रसद पुरवली म्हणून त्यांनी काही जागा जिंकल्या आहेत. आजही मुंबईत मोठ्या प्रमाणावर मतमोजणी थांबली आहे, याला ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड आणि गोंधळच कारणीभूत आहे. हा आकडा नक्कीच बदलेल, अशी आम्हाला खात्री आहे."

मनसेच्या जागा वाढतील

"मनसे यंदा केवळ ५० जागांवर लढली होती, तरीही सध्या ते ९ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहेत. अंतिम निकाल हाती येईपर्यंत मनसेचा हा आकडा आणखी वाढलेला दिसेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT