पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. दरम्यान, कुणाल कामरा याची विनंती मुंबई पोलिसांनी फेटाळली आहे. कामरा याने अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. पण मुंबई पोलिसांनी त्याची विनंती फेटाळली आहे. पोलीस त्याला आता भारतीय न्याय संहिता कलम ३५ अंतर्गत दुसरे समन्स जारी करणार आहेत.
खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले होते. ज्यावर त्याने एका आठवड्याचा वेळ मागितला होता. त्याच्या वकिलाने खार पोलीस स्थानक गाठले आणि कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी खार पोलिसांना देत आठवडाभराची मुदत मागितली होती. खार पोलिसांनी त्याची ही विनंती फेटाळली. त्याला मंगळवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबन गीत सादर केले. यानंतर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर मंगळवारी आणखी एक विडंबन गीत रिलीज केले. "हम होंगे कामयाब..., हम होंगे कामयाब..., हम होंगे कामयाब एक दिन..., मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश...." असे हे गीत आहे.
स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान कामरा याने सादर केलेल्या विडंबनात्मक गीतानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेला अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कॉमेडीच्या नावाखाली सुपार्या घेऊन अपमान करण्याचा प्रयत्न करणार्या कुणाल कामरा विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.