मुंबई : महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी मुंबई पोलीस लवकरच 'बडी कॉप स्क्वॉड' ही अभिनव योजना सुरू करणार आहेत. उशिरा रात्री किंवा पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना प्रवासादरम्यान तातडीची आणि प्रत्यक्ष पोलीस मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः बीपीओ, आयटी, आरोग्य सेवा, हॉटेल, विमान वाहतूक आणि इतर नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या परिसरातील पोलीस ठाण्याशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला रात्री घरी निघाल्यानंतर पोलिसांना माहिती देऊ शकतील. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे 'बडी कॉप स्क्वॉड' त्यांच्या प्रवासावर लक्ष ठेवेल. परिस्थितीनुसार पोलीस कर्मचारी, बीट मार्शल किंवा गस्ती पथक संबंधित मार्गावर तैनात राहून महिलेला सुरक्षितपणे घरी पोहोचण्यासाठी मदत करेल.
मुंबईत महिलांसाठी तुलनेने सुरक्षित वातावरण असल्याची प्रतिमा असली, तरी उशिरा रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, कोणत्याही प्रकारच्या छेडछाड किंवा गुन्ह्यांना आळा घालणे आणि पोलीस मदत अधिक जलद उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक
या उपक्रमासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र 'बड़ी कॉप स्क्वॉड' तयार केले जाणार आहे. या पथकाची जबाबदारी केवळ महिलांच्या रात्रीच्या सुरक्षित प्रवासावर लक्ष ठेवणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पुरवणे अशी असेल
तंत्रज्ञानाचा वापर
या उपक्रमात नियंत्रण कक्ष, स्थानिक पोलीस ठाणे आणि गस्ती पथक यांच्यात समन्वय ठेवून महिलेला आवश्यकतेनुसार तातडीची मदत दिली जाईल. यामुळे कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास किंवा महिला अडचणीत आल्यास पोलिसांना त्वरित हस्तक्षेप करता येणार आहे.
रेल्वेनंतर रस्त्यांवरही सुरक्षा
राज्य सरकारने अलीकडेच मुंबई लोकलच्या महिला डब्यांमध्ये रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीतून घरी परतणाऱ्या महिलांसाठी 'बडी कॉप स्क्वॉड' हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम ठरेल.